Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या घटनेमध्ये २७४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. फ्लाइट एआय-१७१ हे ७८७ ड्रीमलाइनर हे विमान अहमदाबादहून लंडन गॅटविकला जात होतं. मात्र, अहमदाबादवरून टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच हे विमान एका निवासी वसतिगृहात कोसळलं आणि मोठा स्फोट झाला. यात २७४ लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. एअर इंडिया फ्लाइट एआय-१७१ या अपघातग्रस्त विमानातून सीव्हीआर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) सापडले आहेत. त्यामधून अपघाताचं कारण स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१२ जून रोजी अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या अपघातापूर्वीच्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं होतं? याची माहिती तपास यंत्रणांच्या अहवालानंतरच समोर येईल. मात्र, १२ जून रोजी अहमदाबादमध्ये घडलेल्या एअर इंडियाच्या एआय-१७१ विमानाच्या अपघाताची चौकशी करणारे तपासकर्ते फेब्रुवारी २०२० मध्ये गॅटविकमध्ये झालेल्या एका विमानाच्या दुर्घटनेचा बारकाईने अभ्यास करत आहेत. यामध्ये एअरबस ए ३२१ चा समावेश होता. टेकऑफनंतर लगेचच दोन्ही इंजिनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे विमान अचानक उलटल्यानंतर ११ मिनिटांनी गॅटविकला परतण्यापूर्वी मेडे कॉल आला होता.
दरम्यान, अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी अहमदाबादमध्ये यूके एअर अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्रँचला (AIIB) २०२० च्या एअरबस ए ३२१ च्या अपघाताच्या घटनेत असं आढळून आलं होतं की इंजिनमध्ये बिघाड होण्याचं कारण इंधन प्रणालीतील दूषितता होती. तसेच त्या विमानाच्या उड्डाणासाठी देण्यात आलेल्या परवानगीत कोणताही दोष आढळला नव्हता. आता अहमदाबादमधील विमान अपघाताच्या घटनेचा तपासाची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘अपघातापूर्वीच्या २४ तासांमधील एआय-१७१ च्या तांत्रिक नोंदींची सखोल तपासणी कऱण्यात येत आहे. कारण दृश्य निरीक्षण आणि अवशेषांवरून हे स्पष्ट होतं आहे की विमानात वीजपुरवठा खंडित झाला होता.’
दरम्यान, इंडियन एक्सप्रेसशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितलं की, उपलब्ध दृश्य पुराव्यांवरून अहमदाबाद एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) नियंत्रकांचे निवेदन, देखभाल अभियंते आणि अवशेषांच्या प्राथमिक तपासणीवरून तपास संस्थांनी अंदाज लावला की विमानाने उड्डाणानंतर काही सेकंदातच मुख्य विद्युत यंत्रणेची वीजपुरवठा खंडित झाला होता. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. भौतिक पुरावे, ज्यामध्ये अवशेष आणि टेकऑफचे व्हिडीओचा समावेश आहे ते विमानात निश्चितच वीजपुरवठा खंडित झाल्याचे दर्शवित असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
तसेच ब्लॅक बॉक्सचा डेटा मिळवल्यानंतर याबाबतचं कारण स्पष्ट होईल. दरम्यान, या अपघातानंतर विमानातील ब्लॅक बॉक्स आणि डीव्हीआर सापडले आहेत. मात्र, ही उपकरणे खराब झाल्यामुळे त्यातील फाइल काढणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया झाली असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. तसेच अधिकाऱ्याच्या मते ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवण्याबाबत चर्चा सुरू असून तेथे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB) रेकॉर्डिंग पुनर्प्राप्त करण्यात मदत होऊ शकेल.
अधिकाऱ्याने असंही सांगितलं की, इंजिन बिघाडाचं कारण तपासताना सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे मागील २४ ते ४८ तासांच्या विमानाच्या तांत्रिक नोंदीचं विश्लेषण करणं, जेणेकरून मागील कॅप्टन किंवा देखभाल कर्मचाऱ्यांनी काही तांत्रिक गोष्टी नोंदवल्या आहेत का हे निश्चित करता येईल. विमान पॅरिसहून दिल्लीला आणि दिल्लीहून अहमदाबादला येत होतं. ११-१२ जून रोजी त्यांनी दिल्लीहून पॅरिसला राउंड ट्रिप केली. फक्त एक दिवस आधी ते टोकियोला राउंड ट्रिप करून दिल्लीला परतलं होतं. उड्डाणादरम्यान कोणत्याही इलेक्ट्रॉनिक सेंट्रलाइज्ड एअरक्राफ्ट मॉनिटर संदेश आला आहे का? तसेच उड्डाणादरम्यान कोणत्याही थ्रस्ट समस्या आल्या आहेत का हे पाहण्यासाठी आम्ही तांत्रिक नोंदी तपासत असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.