अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानी जनता आणि नवाज शरीफ यांची मुक्तकंठाने प्रशंसा करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानकडून बुधवारी नवाज शरीफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या दुरध्वनी संभाषणाबाबतची माहिती प्रसिद्धी करण्यात आली. या माहितीपत्रकात ट्रम्प यांनी पंतप्रधान नवाज शरीफ आणि पाकिस्तानची स्तुती केल्याचे म्हटले आहे. तुम्ही भन्नाट आहात, असे ट्रम्प यांनी शरीफ यांना उद्देशून म्हटले.  पाकिस्तानी हे जगातील बुद्धिमान लोकांपैकी एक आहेत व पाकिस्तान हा उत्कृष्ट देश आहे, असे ट्रम्प यांनी म्हटल्याचा दावा माहितीपत्रकात करण्यात आला आहे. ८ नोव्हेंबर रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता.

nawaz-sharif-759

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदारांसोबत झालेल्या अनौपचारिक भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदावरील निवडीचे स्वागत केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझे चांगले सख्य आहे, असेही मोदी यांनी म्हटले होते. त्यापाठोपाठ आता नवाज शरीफ यांनीदेखील अमेरिकन नेतृत्त्वाशी सलगी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करत असून ते सगळ्यांच्या दृष्टीसही पडत आहे. तुम्हाला गरज लागली तर मला कधीही फोन करू शकता, असेही ट्रम्प यांनी नवाज शरीफ यांना सांगितल्याचे माहितीपत्रकात म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी २० जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतील. त्यानंतरच्या काळात पाकिस्तानच्या मदतीसाठी आपण कोणतीही भूमिका वठविण्यास तयार असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले. नवाज शरीफ यांच्याशी बातचीत झाल्याच्या वृत्ताला ट्रम्प यांच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे. मात्र याबाबत सविस्तर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे. या संभाषणादरम्यान शरीफ यांनी ट्रम्प यांना पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिल्याचीही चर्चा आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसंबंधी बोलताना अनेकदा टीका केली आहे. पाकिस्तानध्ये दहशतवाद्यांना मिळणारा आश्रय यावरुनही ट्रम्प यांनी पाकिस्तानला लक्ष्य केले होते. लादेनची माहिती पुरवणा-या पाकिस्तानी डॉक्टरला कारागृहात कोणतीच मदत न करु शकणा-या ओबामा प्रशासनावरही ट्रम्प बरसले होते.