सूरत येथील विमानतळावर CISF च्या जवानांनी मोठी कारवाई करत २८ किलो सोन्याची पेस्ट पकडली आहे. यातील २३ किलो सोनं हे शुद्ध सोनं होतं अशी माहितीही देण्यात आली. २० जुलैच्या रात्री १० वाजता एका जोडप्याला पोलिसांनी या प्रकरणी अटक केली. दुबईहून सूरतला हे दोघंही जण आले होते. एअर इंडियाचं विमान IX 174 या विमानाने हे दोघं आले होते. या जोडप्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांची झडती घेण्यात आली. ज्यामध्ये हे २८ किलो सोन्याची पेस्ट आढळून आली.
CISF ला जोडप्यावर संशय कसा आला?
CISF ने दिलेल्या माहितीनुसार दोघांच्या हालाचाली संशयास्पद वाटत होत्या. खास करुन दोघंही खूप विचित्र पद्धतीने चालत होते. त्यामुळे त्यांच्यावरचा संशय वाढला. या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांची झडती घेण्यात आली. या झडती दरम्यान हे कळलं की या दोघांनी सोन्याची पेस्ट शरीराच्या विविध भागांमध्ये लपवली होती. दोघांनीही लपवलेल्या सोन्याचं वजन २८ किलो होतं. ज्यातलं २३ किलो सोनं शुद्ध होतं. या प्रकरणी आता सीमा शुल्क विभागाने पुढील चौकशी सुरु केली आहे. या दोघांचीही चौकशी केली जाते आहे. सोनं तस्करीची कुठली टोळी तर कार्यरत नाही ना? याचा शोध आता घेतला जातो आहे.
CISF ने आणखी काय सांगितलं?
सीआयएसफने दिलेल्या माहितीनुसार जे सोनं पकडण्यात आलं आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. सुरुवातीला जी चौकशी झाली त्यात हे समजलं आहे की हे सोनं दुबईहून सूरतला आणण्यात आलं. सूरतमधल्या एका सराफाला हे सोनं दिलं जाणार होतं आणि त्याच्या मार्फत इतर सराफांपर्यंत पोहचवलं जाणार होतं. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येते आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. सूरत या विमानतळावर गेल्या काही महिन्यांपासून अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे सीआयएसएफ आणि इतर सुरक्षा दलांकडून संशयास्पद हालचालींवर नजर ठेवली जाते आहे. सूरत विमान तळावर जे सोनं पकडलं जाण्याच्या घटना घडल्या आहेत त्यापैकी बहुतांश प्रवासी हे दुबई किंवा शारजाहून परतले आहेत असंही सांगण्यात आलं.
सूरत मध्ये आधी घडलेल्या घटना
२०२४- चार तस्करांनी ट्रॅव्हल बॅगेत ९०० ग्रॅम सोन पेस्टच्या रुपात लपवलं होतं, ते पकडलं गेलं. ज्याची किंमत ७० लाख रुपये होती.
२०२४ मध्ये एका महिलेजवळ ५५० ग्रॅम सोनं आढळलं. त्याची किंमत ४१ लाख रुपये होती. ती शरीराच्या आतून ते सोनं लपवून नेत होती.
२०२३ मध्ये शारजाहून आलेल्या तीन तस्करांकडून ४८ किलो सोन्याची पेस्ट सापडली. त्यात ४२ किलो अस्सल सोनं होतं. या सोन्याची किंमत कोट्यवधींच्या घरात होती. या तस्करीत विमानतळावचा एक अधिकारीही सामील होता.