चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाने टोक गाठलेले असताना, भारत सरकारने अ‍ॅप बंदीचा मोठा निर्णय जाहीर केला. हा निर्णय चीनसाठी एक प्रकारचा आर्थिक झटका होता. कारण या निर्णयामुळे वी चॅट, TikTok सारखी लोकप्रिय अ‍ॅप बंद झाली. अ‍ॅप बंदीचा हा निर्णय होण्याआधी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या. त्याची माहिती आता समोर आली आहे.

भारत आणि चीनमध्ये तिसऱ्या फेरीची लष्करी कमांडर स्तरावरील चर्चा होण्याआधी अ‍ॅप बंदीचा हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. इतका मोठा निर्णय जाहीर करण्याआधी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक होते, त्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयात अख्खी रात्र काम सुरु होते. बाहेर हा निर्णय फुटू नये, त्याची गुप्तता पाळली जावी, यासाठी रविशंकर प्रसाद यांच्या मंत्रालयाचे पडदे ओढण्यात आले होते. जेणेकरुन, आतमध्ये काय सुरु आहे हे बाहेर कोणाला समजू नये.

आणखी वाचा- ‘मेड इन इंडिया’ Koo मध्ये चिनी गुंतवणूक, कंपनीच्या ‘सीईओं’ची कबुली; म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार, आयटी विभागाचे वरिष्ठ अधिकारी काम करत होते. तिसऱ्या फेरीच्या चर्चेआधी अ‍ॅप बंदीचा निर्णय जाहीर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. आयटी मंत्रालय तसेच कायदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत पेपरवर्कचे काम पूर्ण केले. नियंत्रण रेषेजवळ चीन सुरुवातीला थोडा वरचढ स्थितीमध्ये होता. पण ऑगस्ट महिन्यात भारताने जी चाल केली, त्यामुळे चीनला धक्का बसला आणि LAC वर एक संतुलन निर्माण झाले. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीनला संदेश मिळाला पाहिजे, ही पंतप्रधानांची भूमिका एकदम स्पष्ट होती.

पूर्व लडाख सीमेवरील नऊ महिन्यांच्या तणावानंतर पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन भारत आणि चीनने सैन्य मागे घेण्यास सुरुवात झाली आहे. चीनने या भागात केलेल्या अतिक्रमणानंतर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले होते. दोन्ही देशांनी रणगाड्यांसह अत्याधुनिक शस्त्रास्त्रे या भागात तैनात केली होती. हाडे गोठवून टाकणारी थंडी आणि उणे तापमान असलेल्या या भागातून बुधवार सकाळपासून भारत आणि चीनने सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे चीनला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा शांतता आणि स्थिर वातावरण निर्माण होण्याची आशा निर्माण झाली आहे. पँगाँग टीएसओच्या दक्षिण किनाऱ्यावरुन चीनने गुरुवारील २०० पेक्षा जास्त रणगाडे मागे घेतले तसेच जवळपास १०० लष्करी वाहनांमधून सैन्य तुकडयांना उत्तर किनाऱ्यावरील फिंगर भागातून पूर्वेला फिंगर आठ येथे नेऊन सोडले.