काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्या लोकसभेतील एका वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देश आणखी किती #ActOfModi सहन करणार? असा प्रश्न त्यांनी केला आहे.

“मोदी सरकारचा अंधळा अहंकार देशाच्या दुर्दशेसाठी कधी देवाला तर कधी जनतेला दोषी ठरवतो मात्र, स्वतःच्या गलथान कारभाराला आणि चुकीच्या धोरणांना नाही. देश आणखी किती #ActOfModi सहन करणार?” असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.

लोकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले आहेत. देशात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी हे विधान केलेलं आहे. तसेच, ज्या प्रकारे या महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपल्या नेतृत्वाचे सामर्थ्य दर्शवले, त्याबद्दल आपण त्यांचे आभारी असायला हवे. असे देखील हर्षवर्धन म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

कृषी विधेयकांच्या मंजूरी दरम्यान राज्यसभेत झालेल्या गोंधळाप्रकरणी राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडू यांनी काँग्रेसच्या तीन खासदारांसह आठ खासदारांना निलंबित केलं आहे. या निलंबनाच्या कारवाईवरूनही राहुल गांधी यांनी मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.

“लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच आहे. सुरूवातीला आवाज दाबला गेला. त्यानंतर खासदारांना निलंबित करण्यात आलं आणि शेतकऱ्यांसाठी आणलेल्या काळ्या कायद्याकडे डोळेझाक करण्यात आली. या सर्वज्ञानी सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललं आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केलेली आहे.