Rs 30 pav bhaji helped police crack Rs 3-crore heist at jewellery shop Crime News : कर्नाटकातील कलबुर्गी शहरातील पोलिसांनी दागिने आणि रोकड असे एकूण ३ कोटी रूपयांच्या मालमत्तेच्या चोरीचा छडा लावल्याची माहिती दिली आहे. विशेष बाब म्हणजे या चोरीच्या घटनेतील प्रमुख आरोपीसह तीन संशयित हे एका ३० रूपयांच्या पाव भाजीमुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहे.
पोलिसांनी या अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून २.१५ कोटी रुपयांचे दागिने देखील जप्त केले आहेत. अयोध्या प्रसाद चौहान(४८), फारुक अहमद मलिक (४०) , सोहेल शेख उर्फ बादशाह (३०) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. फारूक हा मूळचा पश्चिम बंगालचा आहे आणि तो कलबुर्गी येथे सोन्याचा व्यवसाय करतो. तर सोहेल हा मुंबईचा असून ते टेलर आहे.
नेमकं काय झालं होतं?
११ जुलै रोजी मास्क घातलेले चोर मार्थुला मलिक यांच्या सोन्याच्या दुकानात घुसले होते. त्यांनी दुकान मालकाचे हात आणि पाय दोरीने बांधले आणि त्यानंतर लॉकर उघडून तीन किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड घेऊन फरार झाले.
मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानाच्या मालकाने त्याच्या दुकानातील जाहीर न केलेले सोने लपवण्यासाठी फक्त ८०५ ग्रॅम सोने चोरीला गेल्याचा दावा केला आहे.
पोलिस आयुक्त एस. डी. शरणप्पा म्हणाले की, आरोपींकडून पोलिसांनी २.८६५ किलो सोने आणि ४.८० लाख रुपये रोख जप्त केले आहेत. तसेच फारुक हा या दरोड्याच्या मागील सूत्रधार होता. त्याचे मोठे नुकसान झाले होते आणि त्याचे कर्ज ४० लाख रुपयांपर्यंत वाढले होते, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
११ जुलै रोजी आरोपींनी हत्यारं आणि बंदुका घेऊन शहराच्या मध्यभागी असलेल्या दुकानावर हल्ला केला आणि सोने आणि रोख रक्कम चोरली. पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी ५ पथके तयार केली होती.
अखेर असा लागला शोध
एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, पोलिसांनी सुरूवातीला आरोपींचा परिसरातून गोळा केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मागोवा घेण्याचा प्रयत्न केला.
“दरोड्याच्या आधी आरोपी ठिकाणावर पोहचले आणि त्यांच्यात चर्चा झाली. फारूक हा देखील तेथे होता. जेव्हा ते दुकानाकडे निघाले, तेव्हा फारूकने फोनपेने ३० रुपये देऊन पाव भाजी विकत घेतली. तो या दरोड्याचे मॉनिटरिंग करत होता. दरोड्यानंतर सर्वजण परत आले आणि फारूक याच्याबरोबर घटनास्थळावरून पळून गेले. आम्ही केलेले पेमेंट तपासला आणि त्याचा फोन नंबर मिळवला. आम्हाला आढळून आले की तो नंबर फारूक याचा होता. हा मोठा सुगावा होता, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
आरोपींनी त्यांचे फोन टाकून दिले होते तरी पोलिसांची पथके त्यांच्या मूळ शहरात त्यांची वाट पाहत तळ ठोकून होते. आरोपींनी सोन्याचे दागिने वितळवून काही सोने विकले आणि त्यांच्या घरी परतले. पण घरी परत येताच त्यांना पकडण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात ते अजून अरबाज आणि साजिद या दोन आरोपींचा शोध घेत आहोत.
लायटर दाखवून टाकला दरोडा
तपासात समोर आले आहे की, आरोपींनी दरोड्यादरम्यान बंदुकीसारखे लायटर दाखवून दुकानातील लोकांना भीती घातली आणि दरोडा टाकल्यानंतर ते बसने मुंबईला निघून गेले आणि तेथून ते वेगवेगळ्या मार्गांनी निघून गेले.
दरम्यान सोन्याच्या दुकानाचा मालक मार्थुला मलिक याने नंतर त्याच्या दुकानातून ३ किलो सोने चोरीला गेल्याचे कबूल केले, असे पोलिसांनी सांगितले आणि पोलीस त्याचीही चौकशी करत असल्याचे सांगितले.