Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी या दोघांचं लग्न ११ मे रोजी झालं होतं. त्यानंतर २० मे रोजी हे दोघंही हनिमूनसाठी घरातून निघाले. राजा घरी परतणारच नाही हे रघुवंशी कुटुंबाला माहीत नव्हतं. सोनमने अत्यंत पद्धतशीरपणे त्याला संपवण्याचा कट त्याच्याशी लग्नानंतर सात दिवसांत म्हणजेच १८ मे रोजीच आखला होता. २३ मे रोजी राजाची हत्या करुन त्याचा मृतदेह दरीत फेकण्यात आला. ही घटना घडली तेव्हा सोनमही तिथे उपस्थित होती. या हत्येच्या नऊ तास आधी काय घडलं ही माहिती आता समोर आली आहे.
सोनमने सुपारी देऊन घडवून आणली राजाची हत्या
राजा रघुवंशी आणि सोनम यांचा विवाह ११ मे रोजी झाला. त्यानंतर जेव्हा हे दोघं हनिमूनला रवाना झाले त्याआधीच सोनमने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहासह संगनमत करुन राजा रघुवंशीच्या हत्येचा कट आखला. आकाश राजपूत, विशाल चौहान आणि आनंद कुर्मी या तिघांना राजाच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. राजा रघुवंशीच्या हत्येचा मास्टरमाईंड राज कुशवाहा आणि सोनम हेच होते असा दावा पोलिसांनी केला आहे. आता राजाची हत्या होण्यापूर्वीच्या नऊ तास आधी काय घडलं होतं ती माहिती समोर आली आहे.
२३ मेच्या पहाटे काय झालं?
२३ मे रोजी राजा आणि सोनम हे दोघंही शिपारा होम स्टे या ठिकाणी आले. पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी या दोघांनी चेक इन केलं. त्यानंतर सहा वाजण्याच्या सुमारास राजा आणि सोनम हे दोघंही ट्रेकला जाण्यासाठी तयार झाले. याचवेळी सोनमने ज्या तिघांना राजाच्या हत्येची सुपारी दिली होती ते तिघेही जवळच्या एका होम स्टेमध्ये राहिले होते. साधारण १० वाजण्याच्या सुमारास सोनम आणि राजाने ट्रेक करत असताना २ हजार पायऱ्यांचं अंतर पार केलं. त्याआधी त्यांची भेट आनंद, आकाश आणि विशाल यांच्याशी झाली होती. साधारण १० वाजण्याच्या सुमारास राजा, सोनम, आकाश, विशाल आणि आनंद या पाचही जणांना अल्बर्ट या टुरिस्ट गाईडने पाहिलं होतं. अल्बर्टने दिलेल्या जबाबामुळेच सोनमच यामागे असावी हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी तपासाची चक्रं फिरवली. या टुरिस्ट गाईने दिलेल्या माहितीनुसार सोनम या चार जणांच्या मागून चालत होती तर तिच्या चालण्याचा वेग थोडा मंदावला होता.

दुपारी १२.३० च्या दरम्यान सोनमचा सासूला फोन
दुपारी १२.३० च्या दरम्यान सोनमने राजाची आई उमा रघुवंशी यांना फोन केला. मी खूपच दमले आहे आणि उपास ठेवला आहे असं तिने सासूला म्हणजेच राजाच्या आईला सांगिलं. त्यावेळी उमा रघुवंशी राजाशीही बोलल्या. राजाशी हा आपला शेवटचा संवाद आहे हे तेव्हा त्यांना मुळीच वाटलं नव्हतं. साधारण आणखी अर्ध्या तासाने दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हे पाचही जण मावलखियाट या ठिकाणाहून वेई सावदोंग धबधब्याच्या दिशेने निघाला. त्यावेळी सोनलने या तिघांना इशारा केला ज्यानंतर राजाच्या डोक्यावर चाकू हल्ला करण्यात आला. राजाची हत्या करण्यात आली तेव्हा सोनम तिथेच उपस्थित होती. राजाच्या हत्येनंतर सोनमने राजाच्या मोबाइलवरुन सात जन्मो का साथ असं लिहून एक सोशल मीडिया पोस्ट केली. दुपारी २.३० च्या दरम्यान राजाचा मृतदेह दरीत फेकण्यात आला. असा घटनाक्रम राजाच्या मृत्यू आधी घडला ही माहिती समोर आली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
सुरुवातीला जोडपं बेपत्ता झाल्याची बातमी नंतर हत्येची घटना समोर
दरम्यान २३ मे पासून या दोघांचा काहीही संपर्क झाला नाही तेव्हा हनिमूनला गेलेलं जोडपं बेपत्ता या बातम्या समोर येऊ लागल्या. सोनम आणि राजा यांचा शोध घेण्यात येऊ लागला. पण दोघांचा काहीही पत्ता लागत नव्हता. सोनम आणि राजा यांनी २३ मे रोजी होम स्टे मध्ये चेक इन केलं होतं. त्या ठिकाणाहून साधारण २५ किमी अंतरावर राजाचा मृतदेह २ जून रोजी सापडला. राजाचा मृतदेह सापडल्यानंतर सोनमचंही काहीतरी बरं वाईट झालं असावं असा संशय पोलिसांना होता. मात्र तिचाही शोध सुरुच होता. अखेर ८ जूनच्या रात्री उशिरा सोनमने पोलिसांसमोर सरणागती पत्करली. सोनम उत्तर प्रदेशातील गाझीपूर या ठिकाणी पोहचली होती तिथे एका ढाबा चालकाच्या मदतीने तिने घरातल्यांना फोन केला. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि तिला अटक केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २० लाख रुपयांची सुपारी सोनमने दिली होती.