एचटीसी कंपनीने यू अल्ट्रा स्मार्टफोनच्या सफायर एडिशनची घोषणा केली आहे. मात्र सध्या तरी या फोनची ऑर्डर करण्याची सुविधा तैवानमध्येच उपलब्ध असणार आहे. एचटीसीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर सोमवारी नवी घोषणा करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. यानंतर कंपनीकडून यू अल्ट्रा स्मार्टफोनची सफायर एडिशन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
एचटीसी यू अल्ट्रा २८ मार्चपर्यंत प्री-ऑर्डर करता येईल, अशी माहिती एचटीसीच्या ऑनलाईन स्टोरवर देण्यात आली आहे. लक्झरी फोन असलेल्या सफायर एडिशनची पहिली बॅच विकली गेली आहे आणि आता दुसरी बॅच ५ एप्रिलला उपलब्ध होईल, अशी माहिती एचटीसीने ऑनलाईन स्टोरवर दिली आहे.
एचटीसी यू अल्ट्राच्या सफायर एडिशनच्या वरील भागात सफायर ग्लास देण्यात आली आहे. नेहमीच्या गोरिला ग्लासऐवजी एचटीसीने या मोबाईलमध्ये सफायर ग्लास बसवली आहे. यासोबत या फोनसोबत लेदर केसदेखील देण्यात येणार आहे. यासोबत या फोनमध्ये फास्ट चार्जिंग फिचरदेखील देण्यात आले आहे.
एचटीसी यू अल्ट्रा सफायर एडिशनमध्ये १२८ जीबीची मेमरी देण्यात आली आहे. मात्र सफायर ग्लास असलेला या फोनसाठी ६१,९९० रुपये मोजावे लागतील. तर एचटीसी यू अल्ट्राच्या ६४ जीबी मेमरीच्या फोनसाठी ५९,९९० रुपये मोजावे लागणार आहेत. एचटीसी यू अल्ट्रा सफायर एडिशन स्मार्टफोन जगभरात नेमका कधी उपलब्ध होणार, याची माहिती अद्याप एचटीसीने दिलेली नाही.
एचटीसी यू अल्ट्राचे डिझाईन ग्लास-मेटलचे आहे. एचटीसी यू अल्ट्राचा डिस्प्ले ५.७ इंचाचा असून यामध्ये २ के रिजोल्युशन आहे. स्नॅपड्रॅगन ८२१ क्वाड कोर प्रोसेसरवर चालणाऱ्या या फोनमध्ये ४ जीबीचा रॅम देण्यात आला आहे. या फोनची मेमरी २ टिबीपर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
एचटीसी यू अल्ट्रामध्ये हेडफोन जॅक देण्यात आलेला नाही. यासोबत या फोन वॉटर आणि डस्ट प्रूफदेखील नाही. बूमसाऊंड हाय फाय स्पिकर्स हे एचटीसी यू अल्ट्राचे वैशिष्ट्य आहे.