US immigration : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांची जगात चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेचे दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयामध्ये प्रामुख्याने टॅरिफ (आयात शुल्क), बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्यांसह आदी महत्वाच्या धोरणांचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांपासून स्थलांतरितांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. एवढंच नाही तर हजारो बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेतून हद्दपार देखील करण्यात आलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर इमिग्रेशन धोरणांमुळे अमेरिकेतील स्थलांतरितांच्या संख्येत मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील स्थलांतरितांची संख्या १.५ दशलक्ष एवढी कमी झाली असून १९६० नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही घट झाल्याची माहिती समोर आली आहे. प्यू रिसर्च सेंटरचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्या अहवालातून ही माहिती समोर आल्याचं वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

अहवालानुसार, जानेवारी ते जून २०२५ या दरम्यान स्थलांतरितांची संख्या जवळजवळ १.५ दशलक्ष कमी झाली आहे. ज्यामुळे अमेरिकेतील एकूण स्थलांतरितांची संख्या या वर्षाच्या सुरुवातीला ५३.३ दशलक्ष होती ती सुमारे ५१.९ दशलक्ष झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरितांविरुद्धच्या कडक धोरणाचा हा परिणाम असल्याचं सांगितलं जात आहे.

प्यू रिसर्च सेंटरचे वरिष्ठ जेफ्री पासेल यांनी एनबीसी न्यूजशी बोलताना म्हटलं की, “आम्ही ज्या डेटाचा विचार करत आहोत तो एक नाट्यमय बदल दर्शवित आहे.” दरम्यान, या घसरणीचा परिणाम बाजारपेठेतही जाणवत आहे. अहवालानुसार, स्थलांतरितांच्या संख्येत घट झाल्यामुळे ७,५०,००० हून अधिक कामगारांनी काम सोडलं आहे. अमेरिकेतील काम करणाऱ्या लोकांची लोकसंख्या वाढत नाही. याचा अर्थ असा की नवीन स्थलांतरित लोकं येणं हाच एकमेव मार्ग आहे. जर कामगार वाढत नसतील तर ते अर्थव्यवस्थेसाठी कठीण आहे. पण स्थलांतरित लोकसंख्येत झालेली मोठी घट अभूतपूर्व आहे”, असं जेफ्री पासेल यांनी म्हटलं आहे.