पीटीआय, नवी दिल्ली
आग्नेय दिल्लीतील भोगल भागात पार्किंगवरून झालेल्या वादातून अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. त्यांच्या मृत्यूप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.
भोगलमधील चर्च लेन येथे आसिफ कुरेशी (४२) राहत असून गुरुवारी रात्री उशिरा याच परिसरात राहणाऱ्या दोघांबरोबर त्यांचा दुचाकी पार्किंग करण्यावरून वाद झाला. रात्री १०.३० वाजता कामावर परतल्यानंतर कुरेशी यांना त्यांच्या घराच्या फाटकासमोर दुचाकी पार्क केलेली दिसली. ही दुचाकी हटवण्यास सांगितल्यानंतर दोघांनी शिवीगाळ करत कुरेशी यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना राष्ट्रीय हृदय संस्थेत नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली, ज्यात दोन पुरुष कुरेशी यांना ओढत नेत असताना आणि हल्ला करत असताना दिसत आहे. हजरत निजामुद्दीन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर उज्ज्वल (१९) आणि गौतम (१८) या दोघांना अटक करण्यात आली.
आसिफ यांची पत्नी शाहीन कुरेशी यांनी ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला. यापूर्वीही आरोपींनी आसिफशी पार्किंगच्या मुद्द्यावरून वाद घातला आहे, असा आरोप त्यांनी केला.