भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना ‘मानवी बॉम्ब’चा धोका असल्याचा सतर्कतेचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९१ साली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ‘मानवी बॉम्ब’च्या सहाय्याने करण्यात आलेल्या हत्येच्या कटाला अनूसरून वाईट प्रवृत्तींकडून अशाच प्रकारचा खूनाचा कट सध्याचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या बाबतीतही आखला जाण्याची दाट शक्यता आहे. बंदुकी हल्ल्याची शक्यता कमी असून मोदींचा समर्थक म्हणून त्यांच्यात सामील होऊन त्यांच्या जवळ जाऊन मानवी बॉम्बच्या सहाय्याने त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून केला जाण्याची शक्यता आहे.
तसेच मोदींच्या वाराणसी आणि वडोदरा या मतदार संघातच असा हल्ला होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
याआधी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्या जीवाला धोका असल्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेसह(एनआयए) इतर दोन संस्थांच्या अधिकाऱयांकडून ठराविक दूरध्वनी संभाषण यंत्रणांच्या मदतीने तपास केला जात आहे. यातून काही ठोस माहितीही समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.