पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरामध्ये तब्बल १०० वर्ष जुन्या हिंदू मंदिरात काही अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरू केला आहे. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार रावळपिंडीच्या पुराना किला परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे. या मंदिराच्या डागडुजीचं काम सुरू असताना ही तोडफोड करण्यात आली असून तोडफोड करणारे नक्की कोण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंदिराच्या दरवाजांचं आणि पायऱ्यांचं नुकसान

शनिवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास पुराना किला परिसरामध्ये असलेल्या या मंदिराजवळ १० ते १५ लोकांचा जमाव आला आणि त्यांनी मंदिराचं मुख्य द्वार आणि वरच्या मजल्यावरील इतर दरवाजांचं नुकसान केलं. तसेच, मंदिराच्या पायऱ्यांचं देखील त्यांनी नुकसान केल्याचं देखील पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

मंदिरात मूर्ती नव्हती

या तक्रारीनुसार मंदिरामध्ये गेल्या महिन्याभरापासून डागडुजीचं काम सुरू होतं. मंदिराच्या परिसरात काही प्रमाणात अतिक्रमण देखील झालं होतं. काही माफियांनी हा परिसर ताब्यात घेतला होता. २४ मार्च रोजी हे अतिक्रमण हटवण्यात आलं आणि डागडुजीचं काम सुरू झालं. मात्र, डागडुजीचं काम सुरू असल्यामुळे मंदीर परिसरात कोणतेही पूजा विधी होत नव्हते. तसेच, मंदिरात कोणतीही मूर्ती देखील नव्हती.

इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डचे सुरक्षा अधिकारी सैय्यद रझा अब्बास झैदी यांनी बन्नी पोलीस स्थानकात या प्रकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंदिराचे व्यवस्थापक ओम प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार असा प्रकार घडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hundu temple in pakistan 100 year old vandalized by unknown person pmw
First published on: 30-03-2021 at 15:04 IST