एका हिंदू महिलेला खरी ओळख लपवून फसवलं व लग्न केलं त्यानंतर तिला जबरदस्तीनं इस्लाम स्वीकारायला लावला असा गुन्हा उत्तर प्रदेशात दाखल झाला आहे. सत्तावीस वर्षांच्या या महिलेनं पती व त्याच्या कुटुंबियांविरोधात मीरत पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. या महिलेसोबत बजरंग दलाचे काही कार्यकर्तेही तक्रार देण्यासाठी आले होते.
घरातून आपण पळून आलो आहोत आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं आलो असल्याचे तिने सांगितले आहे. तिच्या पतीनं दहा वर्षांपूर्वी हिंदू असल्याचे भासवत या महिलेशी ओळख केली व लग्न केलं. ती कोलकात्याची असून पती मीरतचा आहे. राजू असे नाव सांगत तो तिला कोलकाता येथे भेटला. तिथेच त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर सहा वर्षांनी जेव्हा ते त्याच्या मूळ गावी मीरतला आले तेव्हा तिला समजलं की तो मुस्लीम आहे. पतीनं व त्याच्या कुटुंबियांनी मग तिला बळजबरी करून इस्लाम स्वीकारायला लावला तसेच सगळे मुस्लीम रिवाज पाळायला लावले.
दहा वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं, पण आता खरी परिस्थिती समोर आल्यानंतर आणि ते तिला जबरदस्ती करत असल्यामुळे तिनं आमच्याकडे मदतीची मागणी केल्याचे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. पती व त्याचे कुटुंबिय मारहाणही करत असल्याची तक्रार तिनं केली आहे. बलात्कार, शारीरिक छळ, महिलेची फसवणूक आदी गुन्हे पतीविरोधात पोलिसांनी नोंदवले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून पती मात्र फरार झाला आहे.