कौटुंबिक वादातून पतीनेच शिक्षिका असलेल्या पत्नीची विद्यार्थ्यांसमोर भोसकून हत्या केली. मुदराईमध्ये सोमवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. हत्या केल्यानंतर आरोपीने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले. वर्षभरापासून सुरु असलेल्या कौटुंबिक वादाची परिणीत हत्येमध्ये झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

जी. राथीदेवी असे मृत महिलेचे नाव आहे. रामानाथापुरम जिल्ह्यात राहणाऱ्या जी. गुरुमुनीश्वरम बरोबर राथीदेवीचे सहावर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर राथीदेवीने जुळया मुलांना जन्म दिला. नवऱ्याबरोबर मतभेद असल्यामुळे ती स्वतंत्र राहत होती. बीईडीचा कोर्स केल्यानंतर सरकारी अनुदानित शाळेमध्ये राथीदेवीने शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. साडेतीन वर्षांपासून ती या शाळेमध्ये नोकरी करत होती.

पेशाने सिव्हील इंजिनिअर असलेला गुरुमुनीश्वरम तीन वर्षांपूर्वी भारतात आला. राथीदेवी वर्गात मुलांना शिकवत असताना पावणेचारच्या सुमारास तिची हत्या केली. गुरुमुनीश्वरमने सुरक्षारक्षकाकडून परवानगी घेऊन शाळेत प्रवेश केला. राथीदेवी दुसऱ्या मजल्यावरील वर्गामध्ये शिकवत होती. विद्यार्थ्यांसमोरच नवरा-बायकोमध्ये वादावादी झाल्यानंतर गुरुमुनीश्वरमने त्याच्यासोबत आणलेला चाकू बाहेर काढला व राथीदेवीवर वार केले.

आपल्या डोळयासमोर शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला झाल्याचे पाहून विद्यार्थी बिथरले. त्यांनी आरडाओरडा सुरु केला. शिक्षक तिथे पोहोचेपर्यंत गुरुमुनीश्वरम तिथून निघून गेला होता. रक्ताच्या थारोळयात कोसळलेल्या राथीदेवीच जागीच मृत्यू झाला.