Woman Ran Away with Lover : पती आणि पत्नीचं नातं म्हणजे जगातलं प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं असतं असं मानलं जातं. मात्र या नात्याबाबत कधी कधी विचित्र बातम्याही समोर येतात. पती गंगा स्नान करण्यासाठी गेला असताना पत्नी तिच्या प्रियकराचा हात धरुन पळून गेल्याची घटना आता समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधल्या शिवराजपूरची आहे. पती गंगा स्नान करुन घरी आला तेव्हा पत्नी घरी नव्हती. यानंतर एका तरुणाने पत्नीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप या तरुणाने केला आहे आणि पोलिसांत तक्रारही केली आहे.
पोलिसांनी नेमकं या घटनेबाबत काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवराजपूरचा तरुण गंगा स्नानासाठी गेला होता. त्याची पत्नी घरी थांबली होती. या दरम्यान या दोघांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका दुसऱ्या तरुणाने या माणसाच्या पत्नीला आपल्या कारमध्ये बसवलं आणि दोघंही पळून गेले. पत्नी जाताना घरातले १५ लाख रुपये, दागिने आणि मुलाला घेऊन गेल्याचंही या पीडित तरुणाने म्हटलं आहे. आम्ही आता सदर महिलेचा तपास सुरु केला आहे असं पोलिसांनी सांगतिलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
प्रेमसंबंधांतून हा प्रकार घडल्याची माहिती
गंगा स्नान करुन हा माणूस घरी आला तेव्हा त्याची पत्नी घरी नव्हती. तिचा शोध पती घेऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांकडून त्याला समजलं की त्या दोघांच्या शेजारी राहणाऱ्या माणसाने तिला बरोबर नेलं आहे. एवढंच नाही तर घरातली रोख रक्कम आणि दागिनेही पत्नी घेऊन गेल्याचं या माणसाला कळलं. दरम्यान पोलीस अधिकारी वरुण शर्मा यांनी सांगितलं आहे की सदर विवाहितेला पळवून नेण्यात आलेलं नाही. या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे ही महिला पतीला सोडून नाही तर स्वतःच्या मर्जीने त्या तरुणासह पळाली आहे. आम्ही सदर महिला आणि त्या तरुणाचा शोध घेत आहोत असंही शर्मा यांनी सांगितलं.
अजय नावाचा हा तरुण त्याच्या पत्नीसह शिवराजपूरमध्ये वास्तव्य करत होता. या दोघांच्या शेजारच्या घरात दीपक नावाचा एक दुसरा तरुण राहात होता. अजय बाहेर गेला की दीपक त्याच्या घरी यायचा. अजयची पत्नीही दीपकसह बाहेर फिरायला जायची. या दीपक आणि अजयच्या पत्नीचं अफेअर होतं असं प्रत्यक्षदर्शींनी आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन समजतं आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. आता या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे.