आमच्या हिरव्या रंगासमोर ना नरेंद्र मोदींचा रंग टिकेल ना काँग्रेसचा. आमच्या हिरव्या रंगासमोर कोणीही तग धरु शकत नाही, असे विधान एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. आम्ही जेव्हा हिरवा रंग परिधान करु त्यावेळी सारे काही हिरवेच होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी वादग्रस्त विधान केले. तुम्ही काहीही करा, पण आम्ही जेव्हा हिरवा रंग परिधान करु, त्यावेळी सगळीकडे फक्त हिरवा आणि हिरवाच रंग दिसेल, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरातमधील मंदिरांना भेट देण्याच्या सत्रावरुनही त्यांनी टीका केली. राहुल गांधी गुजरातमध्ये मंदिरांना भेट देत आहेत, मग ते मशिदीत का नाही गेले, असा सवाल उपस्थित करत राहुल गांधींनी मुस्लिमांकडे दुर्लक्षच केले, असा आरोप ओवेसी यांनी केला. शनिवारी देखील राहुल गांधी यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट दिली. गुजरात निवडणुकीत राहुल गांधी यांनी जवळपास २७ मंदिरांना भेट दिली आहे. यापार्श्वभूमीवर ओवेसी बोलत होते. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसने मुस्लिम मतांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. असं करुन ते निवडणुका जिंकू शकतील, पण लोकशाहीच्या दृष्टीने हे घातक असल्याचे मत त्यांनी मांडले.

ओवेसी यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधान केल्याने ओवेसी अडचणीत आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी राजस्थानमधील राजसमंद येथील हत्याकांडावरुन भाजपवर टीका केली होती. भाजप सत्तेत आल्यापासून मुसलमानांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज आमच्याच देशात आम्हाला लक्ष्य केले जाते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. देशात सध्या असे सरकार आहे जे अशा विचारांचे कौतुक करीत त्याला खतपाणी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तीन वर्षांपासून देशात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी अशा घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.