हैदराबादमध्ये भाजपाचे निलंबित आमदार राजा सिंग यांनी रामनवमी निमित्त मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत नथुराम गोडसेचा फोटो मिरवण्यात आला. श्रीराम नवमीचा उत्साह दिवसभर देशभरात विविध ठिकाणी दिसून आला. हैदराबादच्या आसिफनगर भागात सीतारामबाग मंदिराजवळून ही शोभायात्रा निघाली होती ज्यामध्ये नथुराम गोडसेचा फोटो झळकला.
शोभायात्रेत जय श्रीरामच्या घोषणा
या भव्य शोभायात्रेत जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. तसंच जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी अशाही घोषणा देण्यात आल्या. तसंच शोभायात्रेत नथुराम गोडसेचा फोटो होता. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली. आता राम नवमीच्या उत्सवात नथुरामचा फोटो दिसल्याने त्याबाबत चर्चा होते आहे. शोभायात्रेत नथुरामचा फोटो असलेला व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
रामनवमीच्या या शोभायात्रेत काही स्थानिक कलाकार, सांस्कृतिक मंडळं आणि संगीत पथकंही आली होती. तसंच डी.जे.ही याच शोभायात्रेत होता. राजा सिंह यांनी या शोभायात्रेत एक छोटेखानी भाषणही केलं. राजा सिंग यांनी या भाषणात असं म्हटलं आहे की, “आपल्या ज्येष्ठ मंडळींनी अपार परिश्रम आणि कष्ट सोसून प्रभू रामाचे मंदिर साकारले आहे. आता आपल्याला आपलं लक्ष्य काशी आणि मथुरा येथील मंदिरांवर केंद्रीत करायचं आहे. त्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. हिंदूंनी कुणालाही घाबरू नये. एक हिंदू १० हजार लोकांशी लढू शकतो हे विसरू नका. आपल्याला हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे ” असं राजा सिंग यांनी म्हटलं आहे.