इस्लामिट स्टेटमध्ये सामील होण्यासाठी सीरियाकडे निघालेल्या तीन तरुणांना नागपूरमधील विमानतळावरून गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. त्या तरुणांपैकीच एक असलेला हैदराबादमधील सयद उमर फारूक हुसैनी याच्या वर्तणुकीतील बदलांबद्दल त्याच्या वडिलांनीच माहिती दिली आहे. उमरने २४ डिसेंबरला घर सोडण्यापूर्वीच त्याचा बी.एस्सीचा (मायक्रोबायोलॉजी) निकाल आला होता. त्यात सलग दुसऱ्यांदा तो नापास झाला होता. त्यानंतरच त्याने घर सोडल्याचे त्याचे वडील सयद अझिझुल्ला हुसैनी यांनी सांगितले.
उमरचे दोन चुलत भाऊ मोहंमद अब्दुल्ला बसिथ (२०) आणि माझ हसन फारूख (२२) हे दोघेही आयसिसच्या प्रभावाखाली होते. आयसिसमध्ये सामील होण्यासाठी ते दोघेही निघाले होते. सप्टेंबरमध्ये त्या दोघांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळेपासून उमर हा सुद्धा आयसिसच्या प्रभावाखाली होता, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. या संघटनेपासून तो दूर राहावा, यासाठी त्याचे वडील आणि घरातील इतर व्यक्ती त्याच्यावर लक्ष ठेवून असत. मात्र, घराच्या बाहेर पडल्यावर तो आपल्या दोन चुलत भावांच्या संपर्कात असायचा. या तिघांनी मिळूनच सीरियाला जाण्याचे नियोजन केले. परीक्षेमध्ये नापास झाल्यापासून उमर सातत्याने बसिथ आणि फारूख यांच्या संपर्कात होता. त्यांनीच त्याला आयसिसमध्ये जाण्यासाठी फूस लावल्याचा आरोप उमरच्या वडिलांनी केला. त्यातच ऑक्टोबरमधील परीक्षेत पुन्हा नापास झाल्यामुळे उमर जास्त घाबरला आणि त्यातूनच त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला असावा, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. घर सोडल्यावर हे तिघेही आयसिसमध्ये सामील होण्यासाठी निघाले होते. त्याची माहिती पोलिसांनी मिळाल्यावर तिघांनाही नागपूर विमानतळावरून अटक करण्यात आली.