पाकिस्तानात हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले कुलभूषण जाधव यांना भेटायला सोमवारी त्यांची आई आणि पत्नी गेल्या होत्या. मात्र कुलभूषण जाधव यांना त्यांच्याशी मराठीतून संवाद साधू दिला नाही. तसेच एक काचेची भिंत मधे घालून ही भेट घडवण्यात आली. सुरक्षेचे कारण देऊन जाधव यांच्या पत्नीला मंगळसूत्रही काढायला लावले आणि जाधव यांच्या पत्नीला आणि आईला कपडेही बदलायला सांगितले होते अशीही माहिती सूत्रांकडून समोर येते आहे. एवढेच नाही तर या भेटीनंतर पाकिस्तानचे आभार मानणारा कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडिओही तातडीने प्रसारित करण्यात आला. मात्र जाधव यांच्या कुटुंबियांना अत्यंत हीन वागणूक देण्यात आली. या अपमानास्पद वागणुकीवर सार्वत्रिक टीका होते आहे. अशात सरबजीतची बहिण दलबीर कौर यांनी, आम्हालाही सरबजीतच्या भेटीच्या वेळी अशाच प्रकारे हीन आणि अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानातील लखपत तुरुंगात सरबजीत होता. त्याला भेटण्यासाठी मी गेले होते. तेव्हा मलाही अशीच अपमानास्पद आणि हीन वागणूक देण्यात आली असे दलबीर कौर यांनी म्हटले आहे. कुलभूषण जाधव यांची भेट परराष्ट्र मंत्रालयाने घडवली. कुलभूषण जाधव यांना कुठे ठेवण्यात आले आहे हे कळू नये म्हणून पाकिस्तानने ही खेळी खेळल्याचा आरोपही दलबीर यांनी केला. एवढेच नाही तर ज्यावेळी मी पाकिस्तानात सरबजीतला भेटायला गेले होते तेव्हा मलाही अशाच प्रकारे अपमानास्पद वागणूक मिळाली होती असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘आजतक’ या वृत्त वाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानात हेरगिरी केल्याचा आणि रॉ या गुप्तहेर संघटनेचे एजंट असल्याचा आरोप पाकिस्तानने ठेवला आहे. तर सरबजीतवर हेरगिरी आणि दहशतवाद पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. सरबजीतला फाशीही देण्यात आली. कुलभूषण जाधव यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आंतरराष्ट्रीय कोर्टाने या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. कुलभूषण जाधव यांनी त्यांच्या कुटुंबाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्यानंतर सोमवारी त्यांची भेट त्यांच्या कुटुंबीयांशी घडवण्यात आली मात्र त्या दरम्यान पाकिस्तानने दिलेली अपमानास्पद वागणूक आता समोर आली आहे. अशीच वागणूक सरबजीतच्या भेटीच्या वेळीही मिळाल्याचे दलबीर कौर यांनी म्हटले आहे.