दिल्लीतील पोलीस ठाण्यात देशद्रोहाची तक्रार झालेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा माझी राष्ट्रभक्ती मोठी असल्याचा दावा केला आहे.
माझ्याविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात आली. मी दलित, गरीब आणि मागासलेल्यांसाठी आवाज उठवला म्हणून मी देशद्रोही ठरतो का?, असे ट्विट केजरीवालांनी केले आहे. याशिवाय, केंद्र सरकार देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी मोदी आपल्या नेत्यांना का अटक करत नाहीत?  असा सवालही त्यांनी उपस्थित केला. देशविरोधी वक्तव्य करणाऱया भाजप नेत्यांना मोदी पाठिशी घालत आहेत. त्यामुळे मोदींपेक्षा माझी राष्ट्रभक्ती नक्कीच श्रेष्ठ आहे. आपल्या विरोधात कितीही तक्रारी दाखल केल्या गेल्या तरी दलितांच्या न्यायासाठी लढा नेहमी सुरूच ठेवणार असल्याचेही केजरीवाल म्हणाले.
रविवारी हैदराबादमधील सरुरनगर पोलीस ठाण्यात केजरीवाल, राहुल गांधी आणि सिताराम येचुरींसह नऊ जणांविरोधात देशविरोधी वक्तव्य केल्याबद्दल न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.