संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या सत्राचे अध्यक्ष अब्दुल्ला शाहिद यांनी कोविशिल्ड लसीसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. आपण पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचं त्यांनी म्हटलंय. कोविशिल्ड लस ब्रिटिश-स्वीडिश फार्मास्युटिकल कंपनी एस्ट्राझेनेका यांनी विकसित केली असून सीरम इन्स्टिट्यूट पुण्यात ती लस तयार करतंय. काही दिवसांपूर्वी युकेने कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींचं लसीकरण ग्राह्य धरणार नसल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, गेल्या काही दिवसांत कोविशिल्ड लसीच्या प्रभाविततेबद्दल आणि सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना अब्दुल्ला शाहिद यांनी केलेलं वक्तव्य महत्वाचं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अब्दुल्ला शाहिद पत्रकार परिषदेत म्हणाले, “की मला भारतात तयार झालेली कोविशिल्ड लस मिळाली असून मी त्याचे दोन्ही डोस घेतले आहेत. कोविशील्ड लस स्वीकारार्ह आहे की नाही, असं किती देश म्हणतील हे मला माहित नाही. पण जगातील अनेक देशांना कोविशील्ड लस मिळाली आहे.” ज्या लसींना जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) किंवा इतर कोणत्याही संस्थेद्वारे प्रमाणित करण्यात आले आहेत, त्या लसींच्या मान्यतेबद्दल विचार केला जावा का, या प्रश्नाचे उत्तर देताना अब्दुल्ला शाहिद यांनी हे वक्तव्य केलं.

“मी भारतात तयार झालेल्या कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असून मी जिवंत आहे,” असं अब्दुल्ला हसत हसत म्हणाले. दरम्यान, भारताने अनुदान, व्यावसायिकरित्या आतापर्यंत १०० देशांमध्ये ६.६ कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस पाठवले आहेत. अब्दुल्ला शाहिद यांचा देश मालदीव हा देखील जानेवारी महिन्यात भारत निर्मित लस मिळवणाऱ्या देशांपैकी एक होता. कोविशील्डचे सुमारे १ लाख डोस तेथे पाठवले गेले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am alive after taking 2 doses of covishield manufactured in india says unga president abdulla shahid hrc
First published on: 04-10-2021 at 12:52 IST