मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज (दि.७) मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात हजेरी लावली. कोर्टाने त्यांना बॉम्बस्फोटाच्या खटल्यासंदर्भात काही प्रश्न विचारले यावर ‘मला माहिती नाही’, अशा स्वरुपाची उत्तरे त्यांनी कोर्टासमोर दिली. कोर्टाने गेल्या आठवड्यात मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना आठवड्यातून किमान एकदा कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, गुरुवारी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगत साध्वींनी कोर्टात हजेरील लावणे टाळले होते.
Malegaon blast case: Special NIA Judge asked Pragya Thakur 'All the witnesses who have been examined till now, it has transpired that there was a blast on 29th September 2008 in which several people died. What do you have to say?' To which she replied- 'I don't know.' https://t.co/gQINeqZ1Wl
— ANI (@ANI) June 7, 2019
त्यानंतर आज विशेष एनआयए कोर्टात साध्वींनी हजेरी लावली. दरम्यान, न्यायमुर्तींनी त्यांना प्रश्न विचारला की, आत्तापर्यंत ज्या साक्षीदारांकडे विचारणा झाली आहे त्यांच्याकडून २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावात स्फोट झाल्याचे समोर आले आहे. याबाबत आपले काय म्हणणे आहे. यावर साध्वींनी ‘मला काहीही माहिती नाही’ असे उत्तर दिले.
कोर्टाने साध्वींनी पुढे विचारले की, आजवर किती साक्षीदारांची चौकशी झाली आहे, याबाबत तुम्हा माहिती आहे का? किंवा तुमच्या वकिलांनी तुम्हाला याची माहिती दिली आहे का? यावरही त्यांनी ‘मला काहीही माहिती नाही’ असेच उत्तर दिले.
कोर्टाने गुरुवारी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, आपली प्रकृती ठीक नसल्याने आपण कोर्टात हजर राहू शकत नाही असे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, त्यांनी गुरुवारी राजपूत समाजाच्या एका कार्यक्रमाला मात्र हजेरी लावली होती. त्यामुळे आज त्यांना कुठल्याही परिस्थितीत कोर्टात हजेरी लावणे गरजेचे होते.