नवी दिल्लीतील उच्चायुक्तालयात आयोजित पाकिस्तानी राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमाला काश्मिरी फुटीर नेत्यांसह उपस्थित राहिल्यानंतर केलेल्या ट्विट्सबाबत आपण कोणालाही स्पष्टीकरण देण्यास बांधील नाही, असे मत परराष्ट्र राज्यमंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी व्यक्त केले आहे.
सोमवारी रात्री नवी दिल्लीतील उच्चायुक्तालयात पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला जम्मू-काश्मीरमधील काही फुटीर नेतेही हजर होते. भारत सरकारचे प्रतिनिधी या नात्याने सिंग हेही काही वेळ त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमातून परतल्यानंतर सिंग यांनी ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर ‘डय़ुटी’ (कर्तव्य) आणि ‘डिस्गस्ट’ (किळस किंवा तिटकारा) अशा शब्दांत आपल्या भावना मांडल्या. आपल्याला नेमून दिलेले काम करण्यासाठी कायद्याने आणि नैतिकदृष्टय़ा बांधणारी शक्ती म्हणजे कर्तव्य आणि आपली न्यायबुद्धी, तत्त्वे आणि आवड यांच्याशी प्रतारणा करावी लागणे म्हणजे किळस किंवा तिरस्कार असा त्या ट्विट्सचा आशय होता.
त्यावरून नवा वाद सुरू झाला. काँग्रेसने सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सिंग यांना त्यांच्या सरकारच्या पाकिस्तानविषयक दुटप्पी भूमिकेने वाईट वाटत होते तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. यापूर्वीही अनेत मंत्र्यांनी पाकिस्तानच्या कार्यक्रमांना जाण्यास नकार दिला आहे, असे ट्विट काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केले.
दरम्यान, सरकार आणि भाजपला मी पूर्णपणे बांधील असून त्यामुळे ट्विटरवरील प्रतिक्रियेमुळे वादंग झालेला असला तरी आपण राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडलेला नाही, असे सिंग यांनी रात्री उशिरा स्पष्ट केले.आपल्या प्रतिक्रियेचा विपर्यास्त करण्यात आल्याचा आरोप करून सिंग यांनी काही प्रसारमाध्यमांवरच ठपका ठेवला.