कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) ने भारताच्या बाजूने निकाल दिल्याचे काल संपूर्ण जगाने पाहिल्यानंतर देखील पाकिस्तानकडून स्वतःचे कौतुक सुरू आहे. पाकिस्तानचे म्हणने आहे की, आयसीजेमध्ये त्यांचा विजय झाला आहे. तर पाकिस्तानच्या या दाव्यावर आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, आपल्या लोकांशी खोटं बोलण हा पाकिस्तानचा नाइलाज आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानवर टीका करताना सांगितले की, खरच सांगतो अस वाट की ते दुसरेच निर्णय वाचत आहेत. आयसीजेचा निर्णय ४२ पानांचा आहे मात्र जर ४२ पानं वाचण्याची त्यांच्यात हिम्मत नसेल तर त्यांनी सात पानांची माध्यमांसाठी दिलेली बातमी वाचावी, ज्यामध्ये प्रत्येक मुद्दा हा भारताच्या बाजूने आहे. मात्र सत्य परिस्थिती ही आहे की, त्यांच्याकडे कोणताच पर्याय राहिलेला नाही. कुलभूषण जाधव प्रकरणी आयसीजेचा निर्णय अंतिम, बंधनकारक असुन यावर आता कुठेही दाद मागितली जाऊ शकत नाही. त्यामुळे आयसीजेच्या निर्णय लागू करणे पाकिस्तानचे कर्तव्य आहे.

या अगोदर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरैशी यांनी आयसीजेच्या निकालानंतर म्हटले होते की, जाधव पाकिस्तानातच राहील. त्याच्याबरोबर पाकिस्तानच्या कायद्यानुसार वागणूक केली जाईल. हा पाकिस्तानसाठी मोठी विजय आहे. त्यांनी हे देखील म्हटले की, त्यांना (भारत) त्याची सुटका हवी होती, मात्र ही मागणी फेटाळण्यात आली. तसेच त्यांना त्याची घरवापसी देखील हवी होती ही मागणी देखील फेटाळण्यात आली. तरी देखील जर ते विजयाचा दावा करत असतील तर त्यांना शुभेच्छा.