जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये गेल्या मंगळवारी पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात हमीरपूर येथील जवान शशी कुमार शहीद झाले. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी त्यांचा मुलगा अक्षय कुमारनं लष्करात भरती होण्याचा निर्धार केला आहे. लष्करात भरती होऊन आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेणार आहे, असं तो म्हणाला.

गेल्या मंगळवारी पाकिस्तानी सैन्यानं जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथील जवान शशी कुमार हे शहीद झाले. गोळीबारात जखमी झालेल्या कुमार यांना उधमपूर येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तेथे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. शशी कुमार हे लष्कराच्या १९ पंजाब रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. ३१ ऑगस्टला ते लष्करातून निवृत्त होणार होते. पण त्याआधीच राजौरी येथे तैनात असताना पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात ते शहीद झाले. शशी कुमार शहीद झाल्याचं वृत्त समजताच नादौन येथील त्यांच्या मूळ गावी शोकाकूल वातावरण आहे. तेथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. शहीद कुमार यांच्या पश्चात पत्नी शोभा, मुली प्रियंका आणि आंचल, मुलगा अक्षय आहे. मला लष्करात भरती व्हायचं असून वडिलांच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याचं त्यानं सांगितलं.