भारतीय वायू दलात ताफ्यात विविध प्रकराची हेलिकॉप्टर आहेत. टेहेळणीसाठी, हल्ला करण्यासाठी, लष्करी जवान-साहित्य-शस्त्रास्त्रे यांची ने-आण करण्यासाठी, वेळप्रसंगी नागरी मदत कार्यासाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. यापैकी चिनूक – Chinook CH-47 हे एक वैशिष्टयपुर्ण लष्करी साहित्याची ने-आण करणारे हेलिकॉप्टर वायू दलाच्या सेवेत आहेत. सोमवारी देशामध्ये हेलिकॉप्टरच्या इतिहासात या चिनूकने एक वेगळ्या विक्रमाची नोंद केली.

सोमवारी चिनूकने चंदीगढ ते देशाच्या पूर्व टोकवर असलेल्या आसामधील जोरहाट शहरापर्यंतचा प्रवास एका दमात केला. तब्बल साडे सात चाललेल्या या उड्डाणात चिनूकने तब्बल एक हजार ९१० किलोमीटर अंतर पार करत देशातील हेलिकॉप्टरच्या इतिहासात एका वेगळ्या विक्रमाची नोंद केली. देशाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे प्रवास करत एवढे अंतर पार करण्याची ही एक आगळीवेगळी घटना आहे. यानिमित्ताने संरक्षण दलाने हेलिकॉप्टरच्या ऑपरेशनमधील एक क्षमता जगाला दाखवून दिली आहे. इतकं दीर्घ काळ उड्डाणाचा अनुभव, यानिमित्ताने मनुष्य बळाच्या क्षमतेचा केलेला वापर, हेलिकॉप्टरची आजमावलेली क्षमता असे विविध अनुभव यानिमित्ताने संरक्षण दलाला घेता आले आहेत. अशा दीर्घकाळ केलेल्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचा अनुभव – उपयोग हा प्रत्यक्ष युद्धकाळात होणार आहे.

भारताने सप्टेंबर २०१५ मध्ये अमेरिकेतल्या बोईंग या कंपनीशी चिनूक हेलिकॉप्टबाबत करार केला. तेव्हा ३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किंमत मोजत १५ चिनूक हेलिकॉप्टर विकत घेण्याचे निश्चित केले. २०१९-२० पर्यंत ही हेलिकॉप्टर भारतीय वायू दलाच्या सेवेत दाखलही झाली. गेल्या काही वर्षात विविध लष्करी मोहिमांकरता, नागरी मदतीकरता याचा यशस्वी वापर करण्यात आला आहे.

१० टन पेक्षा जास्त वजन वाहून नेण्याची किंवा ३५ पेक्षा जास्त व्यक्तिंना घेऊन जाण्याची या हेलिकॉप्टरची क्षमता आहे. कागदावरील क्षमतेनुसार एका दमात जास्तीत जास्त दोन हजार १०० किलोमीटर पर्यंत अंतर पार करण्याची चिनूकची क्षमता आहे. एवढंच नाही हेलिकॉप्टरच्या बाहेरच्या बाजूला ३ टनापर्यंत वजन लटकवत, अगदी वेळप्रसंगी हलक्या तोफा वाहून नेण्याची या हेलिकॉप्टरची अनोखी क्षमता आहे. जगभरातील ३० पेक्षा जास्त देशात अशी चिनूक हेलिकॉप्टर वापरली जातात. विशेष म्हणजे गेले काही महिने लडाख परिसरात ही हेलिकॉप्टर तैनात केली आहेत.