IAF Fighter Aircraft MIG 21 Crash Rajasthan: भारतीय वायुदलाचं मिग 21 हे विमान राजस्थानमध्ये एका घरावर कोसळलं. हे विमान कोसळून जो अपघात झाला त्यात दोन महिलांचा मृत्यू झाला तर एक माणूस जखमी झाला आहे. ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. भारतीय वायुदलाचं हे विमान हनुमानगड गावातल्या बहलोल नगरमध्ये कोसळलं. हे विमान ज्या घरावर कोसळलं त्यातल्या दोन महिलांचा मृत्यू झाला. वैमानिक आणि सहवैमानिकाने वेळीच उडी मारल्याने त्या दोघांचे प्राण वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमध्ये एका घरावर हे विमान कोसळलं. हनुमानगढ या ठिकाणी ही घटना घडल्यानंतर तिथे अनेक लोकांनी घटना पाहण्यासाठी गर्दी केली. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी दिली आहे.
MIG 21 हे लष्करी विमान सुतारगडजवळ कोसळल्याची माहिती भारतीय वायुदलानेही दिली आहे. हे विमान रुटीन ट्रेनिंग करत होतं. मात्र अचानक हे विमान कोसळलं. विमान कोसळत असतानाच वैमानिकाने आणि सहवैमानिकाने उडी मारली. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. या अपघाताची चौकशी केली जाईल असं भारतीय वायुदलाने म्हटलं आहे. त्या आशयाचं एक ट्वीटही भारतीय वायुदलाने केलं आहे.
विमान कोसळतं आहे हे लक्षात येताच वैमानिक आणि सहवैमानिक या दोघांनी उडी मारली आहे. ही घटना घडल्यानंतर २ हजार लोकांची गर्दी या ठिकाणी जमली होती. पोलिसांनी गर्दीला मागे सारत मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे अशी माहिती जिल्हाधिकारी रुक्मिणी रायर यांनी दिली आहे.