नवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील मिग-२१ च्या उर्वरित चार लढाऊ स्कॉड्रन येत्या तीन वर्षांत (२०२५ पर्यंत) सेवाबाह्य केल्या जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
यापैकी एक स्कॉड्रन आगामी सप्टेंबरमध्येच सेवाबाह्य होणार आहे. त्याचप्रमाणे मिग-२९ लढाऊ जेटच्या तीन स्कॉड्रनही पुढील पाच वर्षांत सेवेतून बाहेर काढण्याचे नियाजन भारतीय हवाई दलाने केले असल्याचेही या सूत्रांचे म्हणणे आहे.
राजस्थानमधील बारमर येथे गेल्या रात्री हवाई दलाचे एक मिग-२१ विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या घटनेचा वरील निर्णयाशी कोणताही संबंध नाही, तर सोविएत रशियात तयार झालेली ही मिग विमाने सेवाबाह्य करण्याचा निर्णय हा भारतीय हवाई दलाचे अत्याधुनिकीकरण करण्याच्या मोहिमेचा भाग आहे, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. बारमर येथे झालेल्या मिग दुर्घटनेत विंग कमांडर एम. राणा आणि फ्लाइट ल्युटेनंट अद्वितीय बाल या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. एका स्कॉड्रनमध्ये सामान्यत: १७ ते २० लढाऊ विमाने असतात.