करोना व्हायरसने जगात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी लॉक डाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या कामाच्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. परंतु असे बरेच नायक आहेत जे लाखो गरजूंना मदत करत आहेत. आयएएस अधिकारी निकुंजा ढल हे असंख्य नायकांपैकी एक आहेत.

आयएएस असोसिएशनने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. वडिलांच्या मृत्यूच्या २४ तासानंतर निकुंजा ढल यांनी पुन्हा आपले काम सुरू केले आहे. सरकारने करोनाव्हायरस विरूद्ध उभारलेल्या लढ्यात ते पुढे येऊन काम करत आहेत.

निकुंजा हे ओडिशा सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या सचिवपदी कार्यरत आहेत. वडिलांच्या मृत्युनंतर ते दुसऱ्याच दिवशी सेवेत हजर झाले आहेत.

ओडिशा सरकारने करोनाचा कहर लक्षात घेऊन राज्यातील सर्व संबंधित सरकारी विभागांतील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. निकुंजा हे राज्यातील रुग्णालयांकडूनच आरोग्य व्यवस्थेविषयी सातत्याने माहिती घेत आहेत तसेच सर्वत्र सुरक्षा आणि जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवरही देखरेख ठेवत आहेत.

ओडिशामध्ये करोना विषाणूचा एक रुग्ण आढळला आहे. रुग्णाला भूपनेश्वरच्या कॅपिटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि आतापर्यंत कोणतीही गंभीर लक्षणे आढळली नाहीत. मात्र ही व्यक्ती १२९ लोकांच्या संपर्कात आल्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

काही अधिकारी असे असतात जे कर्तुत्वानं आपलं नाव देशवासीयांच्या मनात कोरतात. असाच एक अधिकारी सध्या कौटुंबिक परिस्थिती कठीण असतानाही जनतेसाठी धावून आला आहे. त्यांच्या या कामासाठी नेटकऱ्यांकडून त्यांना कडक सॅल्युट केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.