विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. यंदा क्रिकेट विश्वाला नवीन विश्वविजेता मिळणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाने आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकलेला नाही. सर्वाधिक विश्वचषक ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहेत.

उपांत्य सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला. क्रिकेटच्या इतिहासावर नजर मारल्यास विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आतापर्यंतचा हा पहिलाच पराभव आहे. १९७५ पासून विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली, तेव्हापासून आजतागत क्रिकेट विश्वावर ऑस्ट्रेलिया संघाचे वर्चस्व दिसून येते. यंदा ऑस्ट्रेलिया संघ तब्बल आठव्यांदा उपांत्य फेरीत पोहचला होता. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सातही वेळेस त्यांनी आपला उपांत्य फेरीतील सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर मात करत अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत एकदाही या संघाने पराभवाचं तोंड पाहिलेलं नव्हते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाचवेळा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. तर दोन वेळा संघाला उपविजेतेपदावर(1975 आणि 1996) समाधान मानावे लागले आहे. १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने विश्वचषकावर नाव कोरलं होतं. तर १९७५ आणि १९९६ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाला अंतिम फेरीत पराभवला सामोरं जावं लागले होते. पण उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिल्यांदाच पराभव झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा पराभव झाल्यामुळे यंदा क्रीडा जगताला नवीन विश्वविजेता मिळणार आहे. १४ जुलै रोजी यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्याध्ये अंतिम सामना रंगणार आहे.