माधव अभ्यंकर

क्रिकेटचे प्राथमिक धडे मला माझ्या वडिलांनी दिले. ते स्वत: उत्तम खेळाडू होते. त्यांनी मला क्रिकेटसह अनेक खेळांचे प्रशिक्षण दिले. मी स्वत: रणजीपर्यंत खेळलो आहे. पण पुढे काही कारणांमुळे अन्य क्षेत्राकडे वळलो. तरीही क्रिकेटचे वेड कमी झाले नाही. आता चित्रीकरणादरम्यान सामना पाहणे शक्य झाले नाही तरी सेटवर अनेकांकडून सामन्याचे तपशील कळत असतात. २०११च्या विश्वचषकाच्या विजयानंतर पुण्यात जे वातावरण मी पाहिले ते थक्क करणारे होते. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून जल्लोष करीत होते. फटाक्यांची आतषबाजी झाली. पेढे वाटले गेले. हत्तीवरून साखर वाटणे म्हणजे काय हे मी त्या दिवशी अनुभवले. ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक करताना एका प्रयोगाला अजित वाडेकर उपस्थित होते. प्रयोगानंतर ते रंगमंचावर आले. आणि ‘अशी एकी, ताळमेळ जर भारतीय संघात असेल तर संघ अधिकच बळकट होईल’ असे कौतुकाची थाप त्यांनी सर्वासमोर दिली. ‘‘एवढेच नव्हे तर क्रिकेटपटूच्या अंगी असणारे ‘फूटवर्क’ आज मला नाटकात दिसले. आणि नाटकात ज्या पद्धतीने पदलालित्याचा तू वापर केलास, ते पाहून मी थक्क झालो,’’ या शब्दांत त्यांनी माझी पाठ थोपटली. ही दाद कायम माझ्या स्मरणात राहील.

(शब्दांकन : नीलेश अडसूळ)