|| ऋषिकेश बामणे

क्रिकेट आणि वादविवाद यांचे एक अतूट नाते आहे, याचा प्रत्यय अनेकदा क्रीडाविश्वाला आलेला आहे. यंदाच्या विश्वचषकात गुरुवारीच झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात रोहित शर्माला तिसऱ्या पंचांनी निर्णय आढावा पद्धतीचा (डीआरएस) उपयोग करूनही बाद ठरवल्यामुळे आणखी एका वादाला तोंड फुटले आहे. अशाच प्रकारचा फटका ख्रिस गेललासुद्धा बसला होता. त्यामुळे समाजमाध्यमांपासून ते संपूर्ण क्रिकेटवर्तुळात पंचांची कार्यप्रणाली आणि ‘डीआरएस’बाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. याशिवाय काहींनी ‘आयसीसी’ला याविषयी कठोर कारवाई करण्याचेही सुचवले आहे.

घटना क्र. 1

विंडीजविरुद्धच्या त्या लढतीत केमार रोचने टाकलेला अप्रतिम चेंडू रोहितला चकवून त्याच्या बॅट आणि पॅडमधून यष्टिरक्षकाकडे विसावला. चेंडू अशा प्रकारे जाताना आवाज आल्यामुळे विंडीजच्या खेळाडूंनी झेलबाद असल्याची दाद मागितली; परंतु मैदानावरील पंचांनी रोहितला नाबाद ठरवले. काही सेकंद विचारविनिमय करून विंडीजच्या खेळाडूंनी ‘डीआरएस’चा वापर केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ऑक्टोबर २०१७ पासून लागू झालेल्या नव्या नियमांनुसार मैदानावरील पंचांनी फलंदाजाला बाद ठरवले तर त्याविरुद्ध पूर्ण पुरावा असल्याशिवाय तिसरे पंच फलंदाजाला बाद ठरवू शकत नाही. मात्र या सामन्याचे तिसरे पंच मायकल गॉग यांनी रोहितचे अधिक बारकाईने चित्रण न पाहता थेट बाद ठरवल्यामुळे रोहितबरोबर सर्वानीच आश्चर्य व्यक्त केले. मुख्य म्हणजे ज्या वेळी चेंडूने रोहितला पार केले, त्याच क्षणी त्याची बॅट आणि पॅड एकाच रेषेत असल्यामुळे चेंडूने नक्की बॅटला प्रथम स्पर्श केला आहे की पॅडला, हे सहज समजत नव्हते. अशा परिस्थितीत तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवणे क्रमप्राप्त होते, परंतु त्यांनी फक्त एकच चित्रण पाहून रोहितला बाद ठरवले.

घटना क्र. 2

६ जून रोजी झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात ख्रिस गेलला सलग दोनदा मैदानावरील पंचांनी चुकीचे बाद दिले. दोन्ही वेळेस ‘रीव्ह्य़ू’ उपलब्ध असल्याने गेल बचावला. मात्र तिसऱ्या वेळीसुद्धा पंचांनी बाद दिल्यावर गेलला माघारी परतावे लागले; परंतु धक्कादायक बाब म्हणजे गेल बाद होण्यापूर्वी मिचेल स्टार्कने टाकलेला चेंडू ‘नो बॉल’ असल्याचे चित्रणामध्ये स्पष्ट झाले. त्यामुळे पंच ख्रिस गॅफनी यांनी त्या चेंडूला ‘नो बॉल’ ठरवले असते, तर गेल बाद झालेला चेंडू ‘फ्री हीट’ ठरला असता.

‘यूडीआरएस’ म्हणजे नक्की काय?

पंच निर्णय आढावा पद्धती म्हणजेच ‘अंपायर डिसिजन रीव्ह्य़ू सिस्टीम’ ( यूडीआरएस). याचा वापर प्रामुख्याने मैदानावरील पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी केला जातो. ज्या वेळी पंच स्वत: तिसऱ्या पंचांशी सल्लामसलत करून निर्णय देतात, त्याला ‘अंपायर रिव्ह्य़ू’, तर खेळाडूंनी घेतलेल्या रीव्ह्य़ूला ‘प्लेयर्स रिव्ह्य़ू’ असे म्हणतात. तिसऱ्या पंचांचे काम अधिक सोपे होण्यासाठी त्याला चित्रणाद्वारे विविध बाजूंनी फलंदाज बाद आहे की नाही, हे दाखवले जाते. यामध्ये स्टम्प माइक, स्निको मीटर, बॉल ट्रॅकिंग या सर्वाचा वापर केला जातो.

१९९२च्या विश्वचषकापासून तिसऱ्या पंचांची सकल्पना अस्तित्वात आली; परंतु यानंतरही निर्णय प्रक्रियेत काही चुका राहू लागल्याने श्रीलंकेच्या सेनका वीररत्ना यांनी १९९७ मध्ये ‘डीआरएस’ची संकल्पना मांडली. मग ‘आयसीसी’ने कसोटी क्रिकेटमध्ये २००८ (भारत वि. श्रीलंका) आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०११ मध्ये (इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया) त्याची अंमलबजावणी केली. द्विराष्ट्रीय अथवा तिरंगी मालिकेत ‘डीआरएस’ वापरायचा की नाही, हे त्या मालिकेत खेळणाऱ्या संघांच्या इच्छेनुसार ठरवले जाते. मात्र २०११च्या विश्वचषकापासून ‘आयसीसी’च्या सर्व प्रतिष्ठित स्पर्धामध्ये ‘डीआरएस’चा वापर करणे अनिवार्य आहे. यंदाच्या विश्वचषकात २७ जूनपर्यंत झालेल्या ३४ सामन्यांत तब्बल ५१ वेळा ‘डीआरएस’चा अवलंब करण्यात आला. यापैकी २२ वेळा ‘रीव्ह्य़ू’ घेणाऱ्या संघाला यश लाभले. पंच ख्रिस गॅफनी यांना आतापर्यंत सर्वाधिक तीन वेळा निर्णय बदलावा लागला असून, इयान गोल्ड व रुचिरा पालिगुरुगे यांना दोन वेळा निर्णय बदलावा लागला. अफगाणिस्तान आणि विंडीज याबाबतीत प्रत्येकी पाच वेळा कमनशिबी ठरले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक चार वेळा ‘रीव्ह्य़ू’चा यशस्वी उपयोग केला आहे.

रोहित शर्माच्या बाबतीत तिसऱ्या पंचांची नक्कीच चूक झाली असली तरी, पंचांवर कमी वेळेत योग्य निर्णय देण्याचे दडपण असते. त्याशिवाय तांत्रिक विभागाने पंचांना विविध बाजूंनी चित्रण दाखवणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वस्वी पंचांना या चुकीबाबत दोषी धरता येणार नाही.   – विलास बांदिवडेकर, राष्ट्रीय पंच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निश्चितच पंचांनी दिलेला निर्णय पटण्यापलीकडचा होता. मुख्य म्हणजे विश्वचषकापूर्वी झालेल्या ‘आयपीएल’मध्येसुद्धा पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा किती फटका पडला, हे आपण पाहिले आहे. तंत्रज्ञान हे पंचांच्या सोयीसाठी असले तरी त्यामुळे पंचांनी गाफील राहून चालणार नाही. ‘अंपायर कॉल्स’च्या नियमातही बदल करण्याची आवश्यकता आहे.   – लालचंद राजपूत, माजी क्रिकेटपटू