कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसच्या अपेक्षा

विश्वचषक क्रिकेट स्पध्रेमधील सुरुवातीच्या सामन्यांत सोपी आव्हाने असती, तर कदाचित दक्षिण आफ्रिकेची कामगिरी वेगळी झाली असती, अशी प्रतिक्रिया कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसने व्यक्त केली.दक्षिण आफ्रिकेचे पहिले तीन सामने आठवडय़ाभरात यजमान इंग्लंड, बांगलादेश आणि भारत या संघांविरुद्ध होते. हे तिन्ही सामने गमावल्यामुळे आफ्रिका संघाचा आत्मविश्वास खचला.

‘‘विश्वचषकाचा पहिला आठवडा आमच्यासाठी अतिशय खडतर होता. परंतु विश्वचषकासारख्या स्पध्रेत ही आव्हाने पेलून चांगली सुरुवात करण्याची आवश्यकता होती,’’ असे डय़ू प्लेसिसने सांगितले. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर नऊ गडी राखून विजय मिळवला. हा त्यांचा स्पध्रेतील दुसरा विजय ठरला. यानंतर ते आपला शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहेत.

ड्वेन प्रीटोरियसने यंदाच्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यानंतर मिळालेल्या दुसऱ्या संधीचे सोने करताना २५ धावांत ३ बळी घेतले. याबाबत डय़ू प्लेसिस म्हणाला, ‘‘प्रीटोरियसने अचूक गोलंदाजी केली. हे साध्य करण्यासाठी ताशी १६० किमी वेगाने चेंडू टाकण्याची आवश्यकता नसते किंवा दोन्ही बाजूंनी चेंडू सातत्याने स्विंग करण्याची आवश्यकता नसते.’’

ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळण्याचे प्रीटोरियसचे लक्ष्य

सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा गोलंदाज व्हायचे स्वप्न दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार ड्वेन प्रीटोरियसने जोपासले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेचे लक्ष्य आता मी समोर ठेवले आहे, असे प्रीटोरियसने श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर व्यक्त केले. विश्वचषकामधील हा त्याचा दुसरा सामना होता. ‘‘पुढील वर्षीची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि २०२३मध्ये होणारी एकदिवसीय प्रकाराची विश्वचषक स्पर्धा खेळण्याचा माझा निर्धार आहे. स्वत:ची कामगिरी उंचावून सातत्यपूर्ण कामगिरी करणारा गोलंदाज मला व्हायचे आहे. याशिवाय फलंदाजीचेही योगदान द्यायचे आहे,’’ असे डय़ू प्लेसिसने सांगितले.