भारतीय संघ इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहे. भारताने ४ सामन्यांपैकी ३ सामने जिंकले, तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसाने वाया घालवला. त्यामुळे भारताचे ७ गुण आहेत. भारताने दमदार प्रदर्शन करत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यासारख्या संघांना धूळ चारली. पाकिस्तानविरुद्धचा भारताचा विजय नेहमीप्रमाणेच खास ठरला. पण भारताचा सलामीवीर शिखर धवन हा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. त्याच्या दुखापतीबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसी याने मत व्यक्त केले आहे.
“शिखर धवन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला हे दुर्दैवी आहे. भारतीय संघासाठी हा खूप मोठा धक्का आहे. पण धवन संघात नसण्याचा भारतीय संघाला फारसा फरक पडणार नाही. तो स्पर्धेबाहेर झाला, तरी भारताची कामगिरी वाईट होणार नाही. भारतीय संघात अनेक फलंदाज आहेत. शिखर धवनच्या जागी फलंदाज म्हणून खेळणारे खूप गुणवान फलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय संघ दमदार खेळ करून पूर्ण स्पर्धा गाजवू शकतो”, असे माईक हसी म्हणाला.
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अखेर शिखर धवनच्या रूपाने धक्का बसला. सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. पीटीआय वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले. तसेच भारतीय संघाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.
टीम इंडियाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार धवनच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली असून बोटाला फ्रॅक्चर आहे. जुलैच्या मध्यापर्यंत त्याची दुखापत पूर्णपणे बरी होणे शक्य नाही. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेतील उर्वरित सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागली आहे. जायबंदी शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतला बदली खेळाडू म्हणून अंतिम १५ खेळाडूंच्या संघात स्थान मिळावे अशी विनंती आम्ही केली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, त्यानंतर ICC कडून ऋषभ पंतला संघात बदली खेळाडू म्हणून परवानगी देण्यात आली.
शिखर धवन अंगठयाच्या दुखापतीमुळे वर्ल्डकपला मुकण्याची शक्यता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतरच व्यक्त करण्यात आली होती. त्याच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धवनने दमदार शतक ठोकले होते, पण दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या डावात तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे डावखुऱ्या धवनची दुखापत ऋषभ पंतला संघात स्थान देण्यास कारणीभूत ठरले असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.