भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार दीडशतकी सलामी भागीदारी केली. IPL मध्ये तुफान यशस्वी ठरलेला हैदराबाद संघाचा जॉनी बेअरस्टो याला सूर गवसला. ‘करो या मरो’च्या सामन्यात त्याने ९० चेंडूत तुफानी शतक ठोकले. त्याचा सहकारी सलामीवीर जेसन रॉय यानेही चांगली खेळी करत अर्धशतक केले. पण त्याला बेअरस्टो प्रमाणे अर्धशतकाचे शतकात रूपांतर करता आले नाही. ५७ चेंडूत ६६ धावांची खेळी करून तो माघारी परतला. त्याच्या बाद होण्याची जोरदार चर्चा रंगली. त्याचे कारण होते झेल पकडणारा रवींद्र जाडेजा…
कुलदीप यादवने पहिल्या ४ षटकात तब्बल ४६ धावा दिल्या. पण पाचव्या षटकाच्या सुरुवातीला मात्र कुलदीपने आपल्या गोलंदाजीने जेसन रॉयला जाळ्यात अडकवले. त्याने टाकलेला चेंडू सीमारेषेवर जाडेजाने उत्तमपणे झेलला. चेंडू अतिशय तीव्र वेगाने सीमारेषेच्या दिशेने जात असताना जाडेजाने हेवतच चेंडू झेलला आणि रॉयला माघारी पाठवले.
दरम्यान, भारताने इंग्लडविरुद्धचा सामना जिंकणे हे पाकिस्तानच्या संघाच्या पथ्यावर पडणार आहे. पाकिस्तानला आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी १ विजय आवश्यक आहे. पण त्या बरोबरच इंग्लडचा भारताविरुद्धच्या सामन्यात पराभव होणे हेदेखील पाकिस्तानला महत्वाचे आहे. त्यामुळे भारत – इंग्लंड सामन्यात भारताचे कट्टर विरोधी असलेले पाकिस्तानचे चाहते भारताला पाठिंबा देत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेही पूर्ण पाकिस्तान टीम इंडियासोबत आहे, असे स्पष्ट केले.
एका व्हिडिओमध्ये बोलताना शोएब म्हणाला की संपूर्ण पाकिस्तान आज टीम इंडियाच्या पाठीशी उभं आहे. मी विनंती करतो की इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या पाकिस्तानी चाहत्यांनी देखील टीम इंडियाला पाठिंबा द्यावा. कारण जर आज भारताने इंग्लंडला पराभूत केले, तर त्याचे आव्हान संपुष्टात येईल. त्यानंतर पाकिस्तानला केवळ एकच सामना जिंकता येईल.