दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एकमेकांशी भिडणार आहेत. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आहे. विश्वचषक स्पर्धेत अद्यापही अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेची गुणांची पाटी कोरीच आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ पहिल्यावहिल्या विजयासाठी उत्सुक आहेत.
विश्वचषकातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभूत होण्याची वेळ दक्षिण आफ्रिकेवर खचितच आली आहे. आफ्रिकेने चारपैकी तीन सामने गमावले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे त्यांचे उपांत्य फेरीच्या शर्यतीतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. अफगाणिस्तानला तिन्ही सामन्यांत अनुक्रमे ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्याकडून हार पत्करावी लागली आहे. दक्षिण आफ्रिकेला अद्यापही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नसला तरी अफगाणिस्तान त्यांना आणखी एक धक्का देण्याच्या विचारात आहे.
फलंदाजीत सातत्य नसणे तसेच प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींचा फटका आफ्रिकेला बसला आहे. अनुभवी हाशिम अमला सध्या खराब कामगिरी करत असून त्याच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. त्यामुळे कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस आणि क्विंटन डी’कॉक यांच्यावर अतिरिक्त ताण पडत आहे.
गोलंदाजी हे अफगाणिस्तानचे बलस्थान असले तरी त्यांना फलंदाजीची चिंता सतावत आहे. तंदुरुस्तीच्या कारणास्तव अव्वल फलंदाज मोहम्मद शहझादला स्पर्धेआधीच मायदेशी पाठवण्यात आल्यानंतर अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाला फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे कॅगिसो रबाडा आणि फिरकीपटू इम्रान ताहिरच्या गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानच्या फलंदाजांची कसोटी लागणार आहे. लेग-स्पिनर रशिद खान दुखापतीतून सावरला असून त्याच्यावरच अफगाणिस्तानची भिस्त आहे.
संघ
- अफगाणिस्तान : गुलाबदीन नैब (कर्णधार), मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), नूर अली झादरान, हझरतुल्ला झाझाई, रहमत शाह, असगर अफगाण, हशमतुल्ला शाहिदी, नजीबुल्ला झादरान, समीउल्ला शिनवारी, मोहम्मद नबी, रशीद खान, दौलत झादरान, आफताब आलम, हमीद हसन, मुजीब उर रहमान.
- दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक), जेपी डय़ुमिनी, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, लुंगी एन्गिडी, ब्युरन हेंड्रिक्स, कॅगिसो रबाडा, इम्रान ताहिर, ताबारेझ शम्सी, अँडीले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, व्हॅन डर डुसेन.