इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेत आज (गुरुवारी) ऑस्ट्रेलियाचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असणार आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची कामगिरी समाधानकारक झाली आहे. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या बंदीच्या काळात ऑस्ट्रेलियाच्या संघाची वाताहत झाली होती. पण त्याच्या पुनरागमनानंतर अखेर ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा मुसंडी मारली आणि स्पर्धेत चांगली कामगिरी केली.

सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ १० संघाच्या गुणतालिकेत ५ सामन्यात ८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने सलामीचे २ सामने जिंकून सुरुवात चांगली केली होती. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला. पण त्यानंतरही ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध आणि श्रीलंका विरुद्ध सामने जिंकून ८ गुण मिळवले. परंतु नाणेफेकीच्या बाबतीत मात्र ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच हा खूपच कमनशिबी ठरला आहे. फिंचने या स्पर्धेत अद्याप एकदाही नाणेफेक जिंकलेली नाही. २ सराव सामन्यासह मूळ स्पर्धेतील ५ सामने असे एकूण ७ सामन्यात फिंचने नाणेफेक गमावली. त्यामुळे नाणेफेकीवरून १० वर्षाच्या चिमुरड्याने भर पत्रकार परिषदेत फिंचची फिरकी घेतली.

बांगलादेशविरुद्धच्या सामान्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाने सराव केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषेदेत फिंचने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पण यात १० वर्षाच्या झॅक हॅडीन याच्या प्रश्नानंतर चांगलाच हशा पिकला. सामन्याबाबत सर्व प्रश्न विचारून झाल्यानंतर “सामन्याचे ठीक आहे, पण तू नाणेफेक जिंकणार का?” असा प्रश्न झॅक हॅडीनने विचारला.

झॅक (१०) आणि ह्युगो (७) हे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा ऑस्ट्रेलियाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ब्रॅड हॅडीन याचे पुत्र आहेत. हे दोघेही त्यावेळी पत्रकार परिषदेत शेवटच्या प्रश्नाच्या वेळी फिंचच्या बाजूच्या खुर्च्यांमध्ये येऊन बसले जाणीव त्यातील झॅकने त्याला हा प्रश्न विचारला. दरम्यान याचे उत्तर देताना नाणेफेक जिंकणे आणि आरोन फिंच हे समीकरण कधीच जुळत नाही, असे खुमासदार उत्तर त्याने दिले आणि छान प्रश्न विचारलास असेही झॅकला म्हटले.