श्रीलंका आणि विंडीज यांच्यातील विश्वचषक सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गुणतालिकेत या दोन संघाच्या सामान्यामुळे फारसा फरक पडणार नाही हे क्रिकेटप्रेमींना माहिती आहे. त्यामुळे या सामन्याची फारशी चर्चा होताना दिसत नाही. पण तसे असले तरी विंडीजचा फिरकीपटू फॅबियन ऍलन याने मात्र एक उत्तम झेल टिपून साऱ्यांना या सामन्याची दखल घेण्यास भाग पाडले.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. ९३ धावांची भक्कम सलामी श्रीलंकेचे सलामीवीर करुणरत्ने आणि कुशल परेरा यांनी दिली. मोठा फटका मारताना कर्णधार जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर करुणरत्ने ३२ धावांवर बाद झाला. पण कुशल परेराने डाव सावरत अर्धशतक पूर्ण केले. तो धावेच्या गोंधळामुळे धावबाद झाला. पहिली धाव पूर्ण करून तो दुसरी धाव घेण्यासाठी धावला, पण त्याला अविष्का फर्नांडोने धावेसाठी नकार दिला. पण त्याच्या दुर्दैवाने तो क्रीजमध्ये वेळेत पोहोचू शकला नाही. ६४ धावा करून त्याला तंबूत परतावे लागले. त्यानंतर कुशल मेंडिसच्या साथीने फर्नांडोने डाव पुढे नेला. मेंडिसने चांगली सुरुवात केली होती, पण फॅबियन ऍलन च्या गोलंदाजीवर तो त्याच्याकडेच झेल देऊन बाद झाला.
३१ व्या षटकात फॅबियन ऍलन गोलंदाजीसाठी आला. त्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने फुल टॉस चेंडू टाकला. तो चेंडू कुशल मेंडिसने टोलवला, पण तो चेंडू अपेक्षेप्रमाणे उंच गेला नाही. फॅबियन ऍलनने अत्यंत चपळाईने हवेतच तो झेल टिपला आणि त्याला माघारी धाडले.
त्यानंतर अनुभवी अँजेलो मॅथ्यूजही चांगली सुरुवात मिळाल्यानंतर बाद झाला. त्याने २० चेंडूत २६ धावा केल्या. अविष्का फर्नांडोने मात्र एक बाजू लावून धरली आणि श्रीलंकेला ४० षटकात २५० धावांपर्यंत मजल मारून दिली.