विद्यमान सरन्याायधीश दिपक मिश्रा यांच्यानंतर या पदाचे दावेदार असलेले न्या. रंजन गोगोई यांना जर देशाचे सरन्यायाधीशपदी डावलण्यात आले तर आम्ही व्यक्त केलेला संशय खरा ठरला असे समजले जाईल, असे खळबळजनक वक्तव्य सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी केले आहे. हार्वर्ड क्लब ऑफ इंडियामध्ये लोकशाहीत न्यायव्यवस्थेची भुमिका या विषयावर भाषणादरम्यान त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

या वर्षाच्या सुरुवातीला १२ जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी (न्या. रंजन गोगोई, न्या. एम. बी. लोकुर, न्या. कुरियन जोसेफ आणि न्या. चेलमेश्वर) मिळून पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. वरिष्ठ न्यायाधीशांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्यानतंर सरन्यायाधीशपदासाठी न्या. चेलमेश्वर हे दावेदार आहेत. सरन्याायधीश मिश्रा यांचा कार्यकाळ येत्या २ ऑक्टोबर रोजी संपत आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचे न्यायाधीश असलेले चेलमेश्वर त्यापूर्वी २२ जून रोजीच निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर वरिष्ठतेच्या निकषांनुसार न्या. रंजन गोगोई यांची सरन्यायाधीशपदी वर्णी लागणे अपेक्षित आहे. मात्र, तसे न झाल्यास आम्ही घेतलेल्या पत्रकार परिषदेतील शंका खरी ठरेल असे न्या. चेलमेश्वर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पत्रकार करण थापर यांनी न्या. चेलमेश्वर यांना प्रश्न विचारला की, न्या. दीपक मिश्रा यांच्यानंतर त्यांच्या जागी न्या. रंजन गोगोई यांची वर्षी लागणार नाही, अशी तुम्हाला शंका वाटते का? या प्रश्नाला उत्तर देताना चेलमेश्वर म्हणाले, मी कोणी भविष्यकर्ता नाही. पुढील एका प्रश्नावर ते म्हणाले, सरन्यायाधीशांकडे हा अधिकार आहे की, ते खंडपीठाची स्थापना करु शकतात. मात्र, संविधानिक मार्गाने सर्व अधिकारांसह काही जबाबदाऱ्याही त्यांच्यासोबत जोडल्या जातात. मात्र, हे अधिकार फक्त आपल्याकडेच असल्याने त्याचा सरन्याायधीशांनीही गैरवापर करता कामा नये. उलट त्याचा वापर जनतेच्या कल्याणासाठीच व्हायला हवा. त्याचबरोबर सरन्यायाधीशांवरील प्रस्तावित महाभियोगावर बोलताना न्या. चेलमेश्वर म्हणाले, समस्येवर हा उपाय नाही. महाभियोगाऐवजी व्यवस्था निर्देष करायला हवी. निवृत्तीनंतर मी कुठलेही सरकारी पद सांभाळणार नाही, असेही यावेळी न्या. चेलमेश्वर यांनी सांगितले.