मध्य प्रदेशमध्ये सध्या राजकीय नाट्यमय घडामोडी घडत आहेत. तेथील कमलनाथ यांच्या नेतृत्वातील सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू असल्याचा काँग्रेसकडून आरोप करण्यात आलेला आहे. यासाठी काँग्रेस आमदारांना कोट्यावधी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचाही काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आरोप केलेला आहे. त्यांच्या आरोपामुळे मध्य प्रदेशमधील राजकीय वातावरण सध्या गरम झाले आहे. या पार्श्वभूमीवर कमलनाथ सरकारला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस व्यतिरक्त अन्य आमदारांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारला पाठिंबा दिलेले समाजवादी पार्टीचे एकमेव आमदार राजेश शुक्ला यांनी या संदर्भात एक मोठं विधान केलं आहे. आम्ही कमलनाथ यांच्या सरकारबरोबरच आहोत व त्यांना पाठिंबा देत राहू. कोणतही ऑफर दिली गेली नव्हती. जर कमलनाथ सरकारला काही धोका असेल तर तो काँग्रेसच्या नेत्यांकडून आहे, आमच्याकडून नाही. असं आमदार शुक्ला यांनी म्हटलं आहे.

या अगोदर मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारमधील मंत्री व अपक्ष आमदार असलेले प्रदीप जैस्वाल यांनी आपली भूमिका जाहीर केली होती. “मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार जोपर्यंत आहे, तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर आहे. जर भविष्यात सरकार कोसळलं तर माझ्या मतदार संघातील जनेतच्या इच्छेचा व त्यांच्या विकासाचा विचार करता माझे सर्व पर्याय खुले राहतील.” असं जैस्वाल यांनी म्हटलं होतं.

तर मध्य प्रदेशमधील भाजपा नेते नरोत्तम मिश्रा यांनी या पार्श्वभूमीवर काल एक गौप्यस्फोट केला होता. सत्ताधारी पक्षातील १५ ते २० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा त्यांनी दावा केला आहे. “आमदार माझ्या संपर्कात राहतात. काँग्रेस आमदार त्यांची काम करू शकत नाहीत, ते जनतेला उत्तरदायी असल्याने अंसतोष वाढत आहे. १५ ते २० आमदार आमच्या संपर्कात आहेत.” असं नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रसचे सरकार समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी व अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर आहे. सद्यस्थितीस मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे ११५ तर भाजपाचे १०७ आमदार आहेत. २३० सदस्य संख्या असणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभेत बहुमतासाठी ११६ आमदारांची आवश्यकता असते. अशावेळी काँग्रेसला आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रत्येक आमदार महत्वाचा आहे.