अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना उत्तर कोरियाने थेट धमकी दिली आहे. उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे. तुमची झोप उडेल असा कोणताही निर्णय घेऊ नका अशा शब्दांमध्ये किम यो जोंगने अमेरिकेला धमकावलं आहे. विशेष म्हणजे जो बायडेन यांच्या प्रशासनातील अधिकारी टोकियो आणि सियोलमध्ये दाखल झाले असतानाच उत्तर कोरियाने हा इशारा दिल्याने दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा ताणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. किम यो जोंग या किम जोंग उन यांच्या प्रमुख सल्लागार आहेत.

उत्तर कोरियाने बायडेन प्रशासनावर पहिल्यांदाच थेटपणे टीका केली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये सुरु असणाऱ्या संयुक्त युद्धाभ्यासाला उत्तर कोरियाने विरोध केला आहे. किम यो जोंग यांनी अमेरिकेला इशारा देताना, “पुढील चार वर्ष तुम्हाला सुखाने झोपण्याची इच्छा असेल तर आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करणारं कोणतही पाऊल उचलू नका,” असं म्हटलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन उत्तर कोरिया आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी जपान आणि उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त ते आशियामध्ये दाखल झाल्यानंतर लगेचच उत्तर कोरियाने अमेरिकेला हा इशारा दिलाय. मंगळवारी उत्तर कोरियाने यासंदर्भातील भूमिका एका पत्रकाद्वारे स्पष्ट केलीय.

मंगळवारी अमेरिकेचे हे दोन्ही मंत्री टोकियोमध्ये चर्चासत्रामध्ये सहभागी होती त्यानंतर उद्या म्हणजेच बुधवारी ते सियोलमध्ये दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. उत्तर कोरियामध्ये अंतर्गत विषयांसंदर्भातील सर्व जबाबदारी संभाळणाऱ्या किम यो जोंग यांनी, उत्तर कोरियाला दक्षिण कोरियासोबत सहकार्य करावंसं वाटलं नाही तर लष्करी तणाव समाप्त करण्यासंदर्भात २०१८ साली केलेल्या करारामधून बाहेर पडण्याचा निर्णयही आम्ही घेऊ शकतो असं म्हटलं आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये शांतता टीकवून ठेवण्यासाठी दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली समितीही बरखास्त करण्याची धमकी किम यो जोंग यांनी दिलीय.

प्योंगयांगमधील सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ‘रोदोंग सिनमन’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या उत्तर कोरियाच्या भूमिकेनुसार, “आम्ही दक्षिण कोरियासोबत असणाऱ्या आमच्या संबंधांवर नजर ठेऊन आहोत. जर त्यांच्या हलचाली आम्हाला उकसवणाऱ्या असणाऱ्या तर आम्ही टोकाचं पाऊल उचलू,” असं स्पष्ट करण्यात आलं आहे. ही संधी आम्ही अमेरिकाला इशारा देण्यासाठी वापरु इच्छितो असं सांगत उत्तर कोरियाने अमेरिका आम्हाला उकसवण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे चित्र दिसत आहे, असा टोलाही उत्तर कोरियाने लगावला आहे.

किम यो जोंग यांनी, “जर त्यांना (बायडेन यांना) पुढील चार वर्षांसाठी सुखाने झोपाण्याची इच्छा असेल तर त्यांच्यांसाठी हेच चांगलं ठरले की त्यांनी आम्हाला उकसवणारे निर्णय घेऊ नयेत. त्यांनी असं केलं तर त्यांची झोप उडेल,” असं म्हटलं आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेदरम्यान वार्षिक लष्करी अभ्यास मागील आठवड्यापासून सुरु झाला असून तो गुरुवापर्यंत सुरु राहणार आहे. यापूर्वी अनेकदा उत्तर कोरियाने या संयुक्त अभ्यासाला दक्षिण कोरिया आक्रमणाची तयारी करत आहे असं सांगत यावर आक्षेप घेतलाय. या युद्धाभ्यासाला उत्तर देण्यासाठी उत्तर कोरियाने अनेकदा क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्यात.