इस्रायल आणि हमास युद्धाचा आजचा १८ वा दिवस असून युद्धविरामाची चिन्ह अद्यापही स्पष्ट झालेली नाहीत. दरम्यान, गाझातील रहिवाशांना शांततेत जगायचं असेल तर हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायली ओलिसांची माहिती देण्याची मागणी इस्रायलने केली आहे. इस्रयाल संरक्षण विभागाने X वर मोबाईल नंबरसहित ही मागणी केली आहे.

हमासने अनेक इस्रायली आण परदेशी नागरिकांना ओलिस ठेवलं आहे. या ओलिसांची सुटका करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न इस्रायलकडून सुरू आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी धरलेल्या इस्रायली आणि परदेशी राष्ट्रीय ओलिसांची सुटका करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून IDF गाझामधील रहिवाशांना सुरक्षा पुरवण्याच्या बदल्यात विनंती केली आहे.

IDF ने X वर म्हटलं आहे की, “जर तुम्हाला शांततेत राहायचे असेल आणि तुमच्या मुलांचे भविष्य घडवायचं असेल तर ताबडतोब मानवतावादी कृती करा. तुमच्या परिसरात ठेवलेल्या ओलिसांची माहिती द्या. इस्रायली सैन्याकडून तुम्हाला जास्तीत जास्त सुरक्षा पुरवली जाईल. तुम्हाला आर्थिक बक्षीसही मिळेल. तसंच, तुमच्या गोपनियतेचीही आम्ही हमी देत आहोत.”

तर दुसरीकडे हमासनेही इस्रायलसह वाटाघाटी करायला सुरुवात केली आहे. हमासने दुहेरी नागरिकत्व असलेल्या ५० ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलकडे इंधन पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. परंतु, इस्रायलच्या सरकारने ही मागणी फेटाळली आहे. सर्व २२० ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इंधन पुरवठा सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, असं इस्रायलच्या सरकारने म्हटलं आहे.

हेही वाचा >> ओलिसांच्या सुटकेसाठी हमासने केलेली मागणी मान्य, पण इस्रायलने ठेवली ‘ही’ अट, इजिप्तमार्गे वाटाघाटी सुरू

गाझा पट्टीवर भूमार्गे आक्रमण करण्यासाठी इस्रायली लष्कर सीमेवर सज्ज आहे. ही लष्करी कारवाई लवकरच सुरू होईल अशी शक्यता आहे. त्यापूर्वी इस्रायलने संपूर्ण गाझा पट्टीत हवाई हल्ले केले. त्याबरोबर पश्चिम किनारपट्टी, सीरिया आणि लेबनॉन येथेही हल्ले सुरू ठेवल्यामुळे युद्धाची व्याप्ती वाढण्याची भीती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाझापट्टीत १४ लाख विस्थापित

युद्ध सुरू झाल्यापासून गाझाच्या २३ लाख लोकसंख्येपैकी तब्बल १४ लाख लोक विस्थापित झाले आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांतर्फे देण्यात आली. यापैकी बऱ्याच जणांनी संयुक्त राष्ट्रांच्या आपत्कालीन निवाऱ्यांमध्ये आश्रय घेतला आहे. त्यामुळे तिथे मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली आहे.