संघ आणि भाजप यांच्यात समन्वयाची भूमिका बजावताना वादग्रस्त ठरलेले सहसरकार्यवाह सुरेश सोनी यांचे भाजपमधील महत्त्व कमी करण्यासाठी आता त्यांच्यासोबत तीन ते चार सहकारी देण्याचे संघाने ठरविल्याचे समजते. भाजपमध्ये नको तितका हस्तक्षेप केल्यामुळे सोनींचे पंख छाटण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
भाजपचे प्रभारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावताना सुरेश सोनी यांच्या विरोधात सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे भाजपचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. भाजपची वाटचाल संघाच्या धोरणांशी सुसंगत वाटचाल होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याऐवजी सोनी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून वैयक्तिक अजेंडा राबवत असल्याचा आरोप करण्यात येत होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, संघटन महामंत्री रामलाल यांच्याशी ‘परस्पर समन्वय’ साधून सुरेश सोनी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व पुढे दामटल्याचीही तक्रार सरसंघचालकांकडे अडवाणींनी केल्याचे समजते. या मुद्यावर राजनाथ सिंह यांच्याशी अमरावती येथे झालेल्या संघ प्रचारकांच्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली आणि सोनी यांना समन्वयाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याऐवजी भाजपमधील त्यांचा हस्तक्षेप संपुष्टात आणण्यासाठी त्यांच्यासोबत आणखी तीन ते चार सहकारी देण्याचा तोडगा काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.