बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होतात. त्यामुळेच त्यांना तेथून परांगदा होत भारतात यावे लागते. अशा स्थलांतरितांना मदत छावण्यांत आश्रय घ्यावा लागतो. आमचे सरकार सत्तेत आल्यास या सर्व स्थलांतरितांना देशात इतरत्र स्थायिक करण्यात येईल, असे आश्वासन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे दिले.
मोदी शनिवारी ईशान्येच्या दौऱ्यावर आले होते. येथे आयोजित जाहीर सभेत मोदींनी बांगलादेशी स्थलांतरितांचा मुद्दा ऐरणीवर आणला. बांगलादेशातून परांगदा झालेल्या हिंदूंना आसाममध्ये आश्रय घेण्यावाचून पर्याय नसतो. त्यांना येथील मदत छावण्यंमध्येच राहावे लागते. त्यांचे आयुष्य आश्रिताचेच राहते. मात्र, भाजप सत्तेत आल्यास या मदत छावण्या बंद करून स्थलांतरितांना देशाच्या इतर भागांत स्थायिक केले जाईल असे मोदी यांनी स्पष्ट केले. स्थलांतरितांना आसामात स्थायिक करण्याने येथील भूमिपुत्रांवर अन्यायकारक ठरेल असेही मोदी म्हणाले.
चीनला टोला
दरम्यान, अरुणाचलातील पासीघाट येथे बोलताना मोदी यांनी चीनला विस्तारवादी मानसिकता बदलण्याचा सल्ला दिला. अरुणाचल हा भारताचाच अविभाज्य भाग असल्याने तो बळकावणे कोणालाही शक्य नसल्याचा टोलाही त्यांनी चीनला हाणला. भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या भल्यासाठी, प्रगतीसाठी, सौहार्दासाठी चीनने विस्तारवादी मानसिकता बदलावी, जगातील कोणतीही शक्ती अरुणाचल प्रदेशला बळकावू शकत नाही, असे मोदी म्हणाले.