हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला आणखी एका धक्का बसला आहे. राज्य मंत्रिमंडळातील विद्यमान मंत्र्यांने राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात प्रदेश काँग्रेसची बिकट स्थिती झाल्याचे दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे काही नातेवाईक भाजपमध्ये सहभागी झाले होते.

हिमाचल प्रदेशचे ग्रामीण विकास, पंचायत राज व पशुपालन मंत्री अनिल शर्मा यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपचा हात हातात घेतला होता. अनिल शर्मा हे माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांचे पुत्र आहेत. हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन भाजपचे सदस्यत्व ग्रहण करून मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील, असे शर्मा यांनी आपल्या फेसबुक वॉलवर लिहिले आहे.

खासदार अनुराग ठाकूर यांनी अनिल शर्मा यांचे भाजपमध्ये स्वागत केले आहे. हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. त्याचदिवशी वीरभ्रद सिंह यांचे काही नातेवाईक काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले. वीरभद्र सिंह यांचे नातेवाईक ज्योती सेन आणि इतर काही नातेवाईकांनी काँग्रेसचा त्याग केला. हिमाचल प्रदेशमध्ये ९ नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. दि. १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.