Roshni Khan Murdered Her Daughter: लखनऊमध्ये एका महिलेने तिच्या ५ वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. या महिलेला मुलीच्या हत्येचा आरोप विभक्त झालेल्या पतीवर टाकून तिच्या प्रियकरासोबत राहायचे होते. तिचा प्रियकरही या प्रकरणात सह आरोपी आहे. दरम्यान या महिलेने आणि तिच्या प्रियकराने मुलीची हत्या केल्यानंतर, ड्रग्ज घेतले, तिच्या मृतदेहाशेजारीच शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि रात्रभर तेथेच झोपले, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रोशनी नावाच्या आरोपी महिलेचे उदित नावाच्या पुरूषाशी प्रेमसंबंध आहेत, तो तिचा पती शाहरुखचा मित्र होता. दरम्यान या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सुरुवातीला, महिलेने तिच्या पतीवर तिच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला होता. जेणेकरून तो तुरुंगात जाईल आणि तिला तिच्या प्रियकरासोबत राहता येईल. पण, पोलीस चौकशीदरम्यान, रोशनी आणि उदित यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आणि सांगितले की, त्यांनी ५ वर्षांच्या सायनाच्या तोंडाला रुमाल बांधून हत्या केली.
दोघांनी पोलिसांना सांगितले की, गुन्ह्याच्या दिवशी, रविवारी (१३ जुलै) उदित रोशनीच्या घरी काही खाद्य पदार्थ, सिगारेट आणि दारू घेऊन आला होता. काही वेळाने, सायनाने चुकून त्यांना रोशनीच्या बेडरूममध्ये आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. त्यानंतर, रोशनी आणि उदितने तिला पकडले, तिच्या तोंडाला रुमाल बांधला आणि तिच्या पोटावर पायाने जोरात दाबले, ज्यामुळे सायनाचा मृत्यू झाला.
मुलीची हत्या केल्यानंतर रोशनीने आणि उदितने आंघोळ केली, ड्रग्ज व दारू प्यायली, तिच्या मृतदेहाजवळ शारीरिक संबंध प्रस्थापित केले, रात्रीचे जेवण केले आणि बेडरूममध्ये झोपायला गेले.
यानंतर मंगळवारी रोशनीने पोलिसांना फोन करून सांगितले की, ते राहत असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर विभक्त पती शाहरुख बाहेरून चढला आणि घरात घुसून सायनाची हत्या केली.
सुरुवातीच्या तपासानंतर पोलिसांना असे आढळून आले की, अपघातानंतर शाहरुखच्या पायाची नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती आणि यामुळे त्याला सध्या चालायला येत नाही. तसेच, गुन्हा रोशनीने पोलिसांना कळवण्यापूर्वी ३६ तास आधी घडला होता, तर शाहरुख दोन दिवसांपेक्षा जास्त काळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी रोशनीची पुन्हा चौकशी केली तेव्हा तिने उदितच्या मदतीने सायनाची हत्या केल्याची कबुली दिली.