निम्मे वाघ भारतात; सरकार तसेच स्थानिकांच्या मोहिमेला यश
जगात वाघांची संख्या प्रथमच वाढली असून, त्यातील निम्मे वाघ भारतामध्ये आहेत, असे सोमवारी वन्य जीव अभ्यास गटांनी सांगितले. भारतात गेली काही दशके वाघांची संख्या कमी होत चालली होती, पण आता त्या स्थितीत सुधारणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्याघ्रसंवर्धनाबाबत आयोजित बैठकीचे उद्घाटन मंगळवारी करणार असून त्याआधी हे शुभवर्तमान जाहीर करण्यात आले.
जगातील वाघांची संख्या आता ३८९० झाली आहे असे वर्ल्ड वाइल्ड लाइफ फोरम व ग्लोबल टायगर फोरमने स्पष्ट केले. शंभर वर्षांपूर्वी जगात १ लाख वाघ होते. २०१०मध्ये ३२०० होती, तर आता ३८९० आहे. रशिया, नेपाळ, भारत व भूतानमध्ये वाघांची संख्या वाढल्याने जगात त्यांच्या संख्येत सुधारणा झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी व्याघ्रसंवर्धनाबाबत तिसऱ्या आशिया आंतरमंत्री परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. त्यात वाघांचे अस्तित्व असलेले देश शिकारविरोधी उपाययोजनांवर चर्चा करतील. वाघांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यात सरकारी संस्था, स्थानिक समुदाय व संवर्धक संस्था यांना यश येत आहे, त्यामुळे वाघांची संख्या वाढली आहे, असे डब्ल्यूडब्ल्यूएफ इंटरनॅशनलचे महासंचालक मार्को लॅम्बेरटिनी यांनी सांगितले.
ग्लोबल टायगर इनिशिएटिव्हअंतर्गत पहिली आंतरमंत्री परिषद २०१०मध्ये रशियात झाली होती, त्यात २०२२पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. भारतात २२२६, रशियात ४३३, इंडोनेशियात ३७१, मलेशियात २५० अशी वाघांची संख्या आहे.
भारतात २२२६ वाघ असून रशियात ४३३, इंडोनेशियात ३७१, मलेशियात २५०, थायलंड, नेपाळ, बांगलादेश, भूतान येथे अनुक्रमे १९८, १८९, १०६, १०३ वाघ आहेत.