पीटीआय, लंडन : कॅनडामध्ये खलिस्तानवादी दहशतवादी नेता हरदीपसिंह निज्जर याची हत्या झाल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्या आरोपामुळे उभय देशांत मोठा राजनैतिक पेच उद्भवला आहे. हा तणाव दूर व्हावा, तसेच कायद्याचे अनुपालन व्हावे, अशी भूमिका ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि ट्रुडो यांनी शनिवारी दूरध्वनी संवादादरम्यान मांडली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान निवास-कार्यालयाने (डाऊिनग स्ट्रीट) एका निवेदनात नमूद केले, की सुनक यांनी शुक्रवारी संध्याकाळी ट्रूडो यांच्याशी संवाद साधला. त्यादरम्यान त्यांना भारतातील कॅनडाच्या मुत्सद्दी अधिकाऱ्यांच्या सद्यस्थितीबद्दल माहिती देण्यात आली. या संदर्भात दोन्ही नेते परस्परांशी संपर्क ठेवण्यावर सहमत झाले.
या निवेदनात नमूद केले, की पंतप्रधान सुनक यांनी व्हिएन्ना करारातील तरतुदींसह सार्वभौमत्व आणि कायद्याच्या राज्याचा आदर राखण्याच्या ब्रिटनच्या धोरणाचा यावेळी पुनरुच्चार केला. कॅनडाची राजधानी ओटावा येथील पंतप्रधान ट्रुडो यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनातही हेच मत व्यक्त केले आहे. पंतप्रधान ट्रुडो यांनी कॅनडा आणि भारतातील परस्पर संबंधांच्या ताज्या स्थितीबाबत सुनक यांना माहिती दिली, असेही यात नमुद केले आहे.
खलिस्तानवादी निज्जर याच्या जूनमध्ये झालेल्या हत्येत भारत सरकारच्या हस्तकांचा हात असावा, या विश्वसनीय आरोपाची कॅनडाचे अधिकारी गांभिर्याने तपास करीत आहेत, असे ट्रुडो यांनी कायदे मंडळात सांगितले होते. त्यावर भारताने म्हटले होते की, कॅनडाचे हे आरोप तथ्यहीन असून कुहेतूने करण्यात आले आहेत. कॅनडाने याबाबत भारताला विशिष्ट, ठोस माहिती दिली पाहिजे, असा भारताचा आग्रह आहे.
व्हिएन्ना कराराचा दाखला
कॅनडा सरकारच्या निवेदनात म्हटले आहे, की सुनक आणि ट्रुडो यांनी आंतरराष्ट्रीय राजकीय संबंधांबाबत व्हिएन्ना कराराचा आदर राखण्यावर आणि आपापल्या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असल्यावर भर दिला. भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव कमी करण्याचे महत्त्व अधोरेखित करून, उभयतांनी परस्परांच्या संपर्कात राहण्याचे आणि जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले.
‘ठोस पुराव्याशिवाय टड्रो यांचे आरोप’
वॉशिंग्टन : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टड्रो यांनी गेल्या महिन्यात कॅनडाच्या प्रतिनिधीगृहात ठोस पुराव्याशिवाय भारतावर आरोप केले होते. ही दुर्दैवी बाब आहे, असे ‘यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम’चे (यूएसआईएसपीएफ) अध्यक्ष मुकेश अघी यांनी म्हटले आहे. खलिस्तानी फुटीरतावादी म्होरक्या हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय मध्यस्थाचा सहभाग असल्याच्या ट्रुडो यांच्या आरोपानंतर भारत आणि कॅनडातील तणाव गेल्या महिन्यापासून वाढला आहे. अघी म्हणाले, की कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय भारताविरुद्ध एक महत्त्वाचा आरोप कॅनडाच्या प्रतिनिधीगृहात करण्यात आला. त्यामुळे या दोन्ही देशांमधील संबंध बिघडले हे दुर्दैवी आहे. भारत आणि कॅनडाचे संबंध खूप जुने आहेत. दोन्ही देशांतील व्यापारही मोठा आहे. दोन लाख ३० हजारांपेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी कॅनडात शिक्षण घेतात.