नुकत्याच झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मिळविलेल्या एकहाती सत्तेचे परिणाम भारत चीन संबंधावर होतील, या निवडणुकांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनोबलात वाढ होणार असून त्यांच्या कणखर वृत्तीमुळे चीनसारख्या देशांसोबत तडजोड करताना समस्या निर्माण होणार आहेत, असे प्रतिपादन चीनच्या अधिकृत माध्यमाद्वारे करण्यात आले.

नुकतेच मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये एकहाती विजय मिळविला. उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असून इतर मोठय़ा राज्यांमध्येदेखील मोदींना समर्थन मिळत आहे. असे चीनचा सत्ताधारी पक्ष असलेल्या ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’

यांच्याकडून चालविण्यात येणाऱ्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रात म्हटले आहे. निवडणुकांनंतर प्रथमच चीनमधील माध्यमांनी भाष्य केले गेले असून या लेखात मोदींच्या २०१९ मधील निवडणुकांमध्ये विजय होण्याची शक्यता केवळ वाढली नसून तर त्यांनी पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकालाचे काहींनी भाकीतदेखील केले असल्याचे म्हटले आहे. बीजिंग-दिल्लीचे संबंध सध्या नाजूक असतानाच मोदींची सत्तेवरील पकड अधिक घट्ट झाल्याने या देशातील संबंध कसे बदलतील याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे.

मोदी यांचे कृतिशील व्यक्ती तसेच कणखर वृत्ती असलेले नेते म्हणून त्यांचे या लेखात वर्णन करण्यात आले आहे. मोदी यांनी नवी दिल्लीचे चीन आणि मॉस्कोसोबतचे संबंध वाढविले असून शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या सदस्यत्वासाठी प्रस्ताव केला आहे. मोदी जर पुन्हा पंतप्रधान झाले तर भारताच्या विकासासाठी ते नक्कीच चांगले ठरणार असून यामुळे चीनसोबत सीमावादासंबंधात बोलणी करताना समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.