नवी दिल्ली : “भारत आणि चीनदरम्यानचे संबंध परस्पर आदर, परस्पर संवेदनशीलता आणि परस्पर हितसंबंध या तीन घटकांवर आधारित असले पाहिजेत,” असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी स्पष्ट केले. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांचे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आगमन झाल्यांतर थोड्याच वेळात जयशंकर आणि वांग यी यांची भेट झाली. त्यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली.
बैठकीची सुरुवात करताना, जयशंकर यांनी भारत आणि चीनदरम्यानच्या मतभेदांचे रुपांतर संघर्षात होऊ नये असे सांगितले. ते म्हणाले की, “या प्रसंगी आपल्याला भेटण्याची आणि द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची संधी मिळते. जागतिक परिस्थिती आणि परस्पर हितसंबंधांच्या काही मुद्द्यांवर मतांची देवाणघेवाण करण्याची ही योग्य वेळ आहे,” असे त्यांनी नमूद केले.
भारत आणि चीनदरम्यान सीमावादावर विशेष प्रतिनिधी पातळीवरील चर्चेसाठी वांग यी भारतात आले आहेत. या चर्चेमध्ये वांग यी चीनचे तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल भारताचे प्रतिनिधित्व करतात. वांग यी यांचे दुपारी नवी दिल्लीत आगमन झाले तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाच्या पूर्व आशिया विभागाचे सहसचिव गौरांगलाल दास यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.
आपल्या संबंधांमध्ये आपण खडतर काळ पाहिल्यानंतर आता दोन्ही देश पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी दोन्ही बाजूंनी प्रांजळ आणि रचनात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. – एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री
उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा
वांग यी आणि डोभाल यांच्यादरम्यान मंगळवारी सकाळी ११ वाजता चर्चा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता ते ७ लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतील. या चर्चांमध्ये दोन्ही बाजूंकडून सीमा परिस्थिती, व्यापार आणि विमान सेवा सुरू करणे यासारख्या विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
‘भारताबरोबर सहमती पुढे नेण्याचा प्रयत्न’
बीजिंग : पररराष्ट्रमंत्री वांग यी यांचा भारत दौरा हा दोन्ही देशांदरम्यान सहमती पुढे नेण्याचा प्रयत्न आहे असे चीनकडून सोमवारी सांगण्यात आले. यापूर्वी सीमावादाच्या प्रश्नावर झालेल्या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये दोन्ही बाजूंनी ज्या मुद्द्यांवर सहमती झाली आणि जे निर्णय घेण्यात आले त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.